Join us

‘बंद’ला मुंबईत अल्प प्रतिसाद, राजकीय पक्षांकडून जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:05 AM

राजकीय पक्षांकडून जोरदार निदर्शने : सायन-पनवेल महामार्ग अडविलालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मंगळवारी ...

राजकीय पक्षांकडून जोरदार निदर्शने : सायन-पनवेल महामार्ग अडविला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मंगळवारी मुंबईत अल्प प्रतिसाद मिळाला. वाहतूक व्यवस्थेसह अन्य व्यवहारांवर फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, महाविकास आघाडीसह भाजप विरोधातील राजकीय पक्ष आणि संघटनांनी कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असणाऱ्या भागात मात्र मोठ्या प्रमाणावर दुकाने आणि आस्थापना बंद होत्या.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला मुंबईकरांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. लाॅकडाऊनमुळे आधीच व्यवहार ठप्प असल्याने, बंद शक्य नसल्याची भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली होती. कामगार संघटनांसह रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बसमधील वाहतूक संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुंबईत काही अपवाद वगळता आज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होती. मुंबईत रेल्वे आणि बससेवा सुरू असल्याने जनजीवन सुरळीत होते. राज्य परिवहन, मुंबईतल्या बेस्ट बसेस आणि टॅक्सीसेवा सुरू होती. त्यामुळे सकाळी वाहतुकीवर परिणाम झाला नाही. संवेदनशील क्षेत्रात सुरक्षेचा उपाय म्हणून बेस्ट बसेसच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. काही ठिकाणी रस्ते अडविण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत सायन-पनवेल मार्ग काही वेळ अडविण्यात आला होता.

‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून आज कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने आणि मोर्चे काढण्यात आले. महाविकास आघाडीचा विशेषतः शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या भागात दुकाने बंद होती. दादरमध्ये न.चि.केळकर मार्ग, दादरचे खोदादाद सर्कल, परळ आणि लालबाग परिसरात दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद होती. माहीम आणि माटुंगा परिसरातही दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. चेंबूर, मुलुंड, घाटकोपर परिसरातही बंदचा परिणाम दिसून आला. काळबादेवी परिसरातील दुकाने एक वाजेपर्यंत बंद होती. सकाळीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदारांना प्रत्यक्ष भेटून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

* शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन - बाळासाहेब थोरात

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मुंबईतील पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. थोरात यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नसीम खान, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, आ. भाई जगताप आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदे शेतकरी हिताचे नसून मुठभर धनदांडगे, उद्योगपती, साठेबाज यांच्या फायद्याचे असून यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता जनतेचे आंदोलन झाले आहे, कायदे रद्द केल्याशिवाय ते थांबणार नाही.

* मुंबई काँग्रेसचे चेंबूर येथे धरणे आंदोलन

भारत बंदच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर नाका येथील रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे ताबडतोब रद्द करा, शेतकऱ्यांचा आयुष्याशी खेळ करून त्यांचा अंत पाहू नका, अन्यथा शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा इशारा एकनाथ गायकवाड यांनी केंद्र सरकारला दिला.

* मुलुंडमध्ये पदयात्रा आणि बाईक रॅली

मुलुंड आणि घाटकोपर परिसरात बंद पाळण्यात आला. महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पदयात्रा काढल्या. मुलुंड पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. तिथून पाच रस्ता जंक्शन, एम.जी.रोड मार्गावरून मुलुंड स्टेशन आणि गावडे रोड वरून जे.एन.रोड येथे आणि थेट गाला नगर, सर्वोदय जैन मंदिर अशी पदयात्रा निघाली. तिथून पुढे बाईक रॅलीही काढण्यात आली.

* कायदे थोपविता येणार नाहीत - नवाब मलिक

कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली अणुशक्ती नगर, चेंबुर येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारला कायदे थोपविता येणार नाहीत. कृषी विषय राज्यांच्या आखत्यारित असल्याने सर्व सहमतीने कायदे बनवावे लागतील. तीन्ही कायदे परत घेऊन सर्वसहमतीने आदर्श कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करावी.

* आपकडून कायद्यांची होळी

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात कृषी विधेयकांच्या प्रतींची होळी केली. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

* डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच - आशिष शेलार

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच आता भारत बंद पुकारला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन करतानाच मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला, कोणी कामगारांना फसवले, कोणी कामगारांना उध्वस्त केले, असे प्रश्न उपस्थित केले. आज मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असेही शेलार म्हणाले.