कोकण मंडळाच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद; ७ दिवसांत फक्त २५०० अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 05:46 AM2023-09-22T05:46:45+5:302023-09-22T05:47:05+5:30
कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १५ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली असून, आतापर्यंत २ हजार ५०२ अर्जदारांनी अर्ज केले असून, ९०४ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.
ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५३११ सदनिकांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
काय येतात अडचणी?
एका नावाने अर्ज भरताना पॅन नंबर व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे.
दुसरे युझर नेम वापरले तर बॅंक अकाउंट व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे.
संगणकावर दोन-तीन युजर नेम करूनही अडथळे येत आहेत.
मोबाइल ॲपद्वारे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला काहीसा वेग आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये १०१० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. सदनिका विक्री सोडतीची लिंक १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील.
१८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. पात्र अर्जांची अंतिम यादी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. अर्जदारांना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाइन हरकती नोंदविता येणार आहेत.