धक्का वगैरे नका बसू देऊ. राज ठाकरे महाराष्ट्रातच, त्यांच्या शिवतीर्थावर आहेत. ते कुठे प्रचाराला बाहेर पडलेले नाहीत. अगदी मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकांसाठी मनसेची बांधणी जोरात सुरू आहे. पण, निवडणुकांची दशा आणि दिशाच अद्याप स्पष्ट नाही. प्रचाराचा कोणता दारूगोळा बाहेर काढावा लागणार, हेही ठरायचे आहे.
मनसेचे इंजिन सध्या आपल्याच यार्डात तयारीनिशी उभे असले तरी, अद्याप बाहेर पडलेले नाही. उत्तर प्रदेशात तर त्याहून नाही. पण, २०१४ साली मोदींच्या बाजूने आणि २०१९ ला मोदींच्या विरोधात राज यांनी इतक्या तोफा चालवल्या आहेत की, त्याचा धूर सोशल मीडियावर अजून दिसत राहतो. सध्या उत्तरेत निवडणुकीचे वारे आहे, कोरोनामुळे प्रत्यक्ष प्रचाराला मर्यादा आहेत.
राज ठाकरे यांनी मागे डागलेल्या अनेक तोफा भलत्याच लोकांच्या उपयोगी ठरत आहेत. विविध मुलाखती, भाषणातील मोदी आणि भाजपविरोधातील त्यांचे छोटे छोटे व्हिडीओ त्यांचे रिल्स् सध्या वेगात फिरवले जात आहेत. त्यांची दृश्यमानता जाणविण्याइतपत वाढली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातील काहींनी विशेष रस घेऊन घड्याळ्याचे काटे फिरविल्याची चर्चा आहे.