मुंबई : अवेळी पाऊस तसेच वर्षातून एकदाच तुरीचे पीक घेण्याच्या पर्यायामुळे तूर डाळीचा तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे साठा करण्याचे प्रकार वाढून त्याच्या किमती गगनाला भिडत आहेत. यावर परदेशातून तूर डाळीची आयात करणे हाच पर्याय उरला आहे. मात्र, भारतीय डाळीच्या तुलनेत परदेशातील डाळ बेचव असल्याने त्याच्या विक्रीत अडचणी असल्याचे स्वतः व्यापारी सांगतात. तेव्हा परदेशी व्यापाऱ्यांची भारतीय बाजारात डाळ शिजेल का? अशी शंका उपस्थित होत आहे.महाराष्ट्र आणि गुजरातमधून येणाऱ्या तूर डाळीला अधिक मागणी आहे. या व्यतिरिक्त लातूर, राजस्थान, मध्य प्रदेशामध्ये तूर डाळीची शेती होते. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तूर डाळ आयातीत मोझांबिक, म्यानमार, टांझानिया, मलावी आणि सुदान या देशाचा समावेश आहे.
परदेशी डाळ स्वस्त, पण नाही मस्त! सकाळी बनविलेली डाळ संध्याकाळी टिकत नसल्याने ती बनविल्यावर त्वरित संपवावी लागते. ती डाळ शिजायला बराच वेळ जातो आणि शिजल्यानंतरही पाण्यासारखी लागते.
वर्षभराचे सामान भरलेमहागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडते. त्यामुळे आम्ही वर्षभराचे सामान भरून ठेवतो. ज्यामुळे बाजारातील चढ-उताराचा फारसा फरक आम्हाला पडत नाही.- अमृता जोगळेकर, नोकरदार
मिश्र डाळी ‘पॉकेट फ्रेंडली’ आम्ही तूर डाळसोबत पिवळी मूग डाळ, मसूर तसेच चणा डाळ एकत्र करत वापरतो. त्याने सर्व डाळी पोटात जातात तसेच ते पाॅकेट फ्रेंडली पर्याय वाटतो.- प्रतिभा पेडणेकर, गृहिणी