Join us  

बोर्ली पोस्ट कार्यालयात जागेची टंचाई

By admin | Published: May 23, 2014 3:58 AM

मुरुड तालुक्यातील बोर्ली विभागाची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे

बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील बोर्ली विभागाची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. बोर्ली येथील पोस्ट आॅफिस एका छोट्या खोलीत असल्यामुळे त्यांच्या कर्मचार्‍यांची व येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. बोर्ली पोस्ट आॅफिस हे सध्या एका पाच बाय सातच्या खोलीत भाड्याने आहे. या खोलीत पोस्ट मास्तर व त्यांचे एखाद दोन कर्मचारी काम करीत असतात. या विभागात व्यवसाय करणार्‍या लोकांची संख्या ही वाढत आहे. या पोस्ट आॅफिसमधून बाहेरगावातील येथे असणारे नागरिक तसेच बाहेरगावी असणारे कामगार मनीआॅर्डर, रजिस्टर, पार्सल पाठवतात. त्याचबरोबर स्पीड पोस्टही येत असतात. या पोस्ट आॅफिसअंतर्गत छोटी मोठी अशी ४७ गावे येत असून त्यांची लोकसंख्याही ४५००० च्या आसपास आहे. त्याचबरोबर येथे बँका, पतपेढ्या, सहकारी सोसायटी, शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल त्याचबरोबर व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सदरचे पोस्ट आॅफिस हे रेवदंडा पोस्ट आॅफिसच्या अखत्यारीत असून ही जागा भाड्याची आहे. जी गावे पोस्ट आॅफिस असून लांब अंतरावर आहे, त्यांना थेट रिक्षा करून येथे यावे लागत आहे. पूर्वी लोकसंख्या कमी असताना टपाल वाटपासाठी चार कर्मचारी आहेत. त्यातील दोन कर्मचार्‍यांना ४७ गावात टपालासाठी जावे लागत आहे. बोर्ली या ठिकाणी उप डाक घर असावे अशी मागणी जोर धरीत आहे. बोर्ली पोस्ट आॅफिस सुरू असते. वास्तविक पाहता हे कार्यालय आठ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु फक्त एक तासच काम सुरू असल्याने कामाचा उरक होत नाही. याचबरोबर नागरिकांची गैरसोय होत आहे. बोर्ली पोस्ट आॅफिस हे सध्या भाड्याच्या जागेत असून ग्रामपंचायतीकडे पोस्ट आॅफिससाठी जागेची मागणी केली आहे. ती जागा मिळाल्यानंतर कर्मचारी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, असे बोर्ली पोस्ट आॅफिसचे व्यवस्थापक म. म. सुर्वे यांनी सांगितले. (वार्ताहर)