Join us

फडणवीसांनी शरद पवारांबाबत केलं वक्तव्य; त्यानंतर ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झालं, लिंकही हटवली

By मुकेश चव्हाण | Published: January 18, 2021 8:35 AM

देवेंद्र फडणवीसांनी फेसबुकद्वारे सत्तास्थापनेबाबत बोलताना त्यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते.

मुंबई: गेल्या वर्षी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. याआधी मागील वर्षी झालेल्या सत्तासंघर्षावर प्रियम गांधींनी एका पुस्तक प्रसिद्ध करुन या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. यानंतर आता नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच भाजपाकडे प्रस्ताव पाठविला होता, असा दावा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात एका कार्यक्रमात फेसबुकच्या माध्यमातून ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. त्यावेळी भाजपची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती, असं देवेंद्र फडणवीसांनी फेसबुकद्वारे सांगितले. तसेच सरकार बनविण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. ही सगळी चर्चा देखील शरद पवारांसोबतच झाली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांनी फेसबुकद्वारे सत्तास्थापनेबाबत बोलताना त्यांच्या या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांचे कॅमेरे नाहीत, म्हणून मी दिलखुलासपणे बोलू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र शरद पवारांबाबत त्यांनी वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच ‘फेसबुक लाईव्ह’च बंद झाले. याशिवाय ‘फेसबुक लाईव्ह’ची ‘लिंक’देखील हटविण्यात आली. त्यामुळे अशाप्रकारे ‘लिंक’ हटविण्याचे गुपित काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात खुलासा करण्यात आले होते. यात राष्ट्रवादी भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक होती, स्वत: शरद पवारांनी अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा केली होती. मात्र शिवसेना-काँग्रेससोबत गेल्यास राष्ट्रवादीची ताकद वाढेल या हेतूने शरद पवार यांनी आपलं मन बदललं आणि तिथेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही खलबतं झाली, असं सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारपोलिसमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा