मुंबई - केईएम रुग्णालयात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अडीच महिन्यांच्या चिमुकल्याला डावा हात गमवावा लागला. प्रिन्स राजभर असं चिमुकल्याचं नाव आहे. याप्रकरणी आज भोईवाडा पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिन्सच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे.प्रिन्सच्या वडील पन्नीलाल रामजी राजभर, वय 29 वर्षे हे मधुबन, उत्तर प्रदेश येथे राहतात. त्यांचा अडीच महिन्याचा मुलगा प्रिन्स यास जन्मताच श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने व तपासणीत त्याचे ह्रदयास छिद्र असल्याने त्यास नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी केईएम रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. 7 नोव्हेंबरला ICU वार्ड बेड क्र. 09 येथे उपचार चालू असताना पहाटे 02.50 वाजतच्यादरम्यान रुग्णालयातील नर्स आग आग म्हणून ओरडत आल्या. त्यावेळी वार्ड धुराने भरला होता. नंतर त्यांना अतिदक्षता विभागातील माॅनिटरच्या वायरमध्ये शाॅर्टसर्किट होऊन मुलाचे हात व कान भाजल्याचे समजले. 11 नोव्हेंबरला उपचारादरम्यान ऑपरेशन करून मुलाचा डावा हात दंडातून कापण्यात आला. याप्रकरणी प्रिन्सच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाणे येथे येऊन माॅनिटरचे व विद्युत उपकरणांची देखभाल करणारे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचे निष्काळजीपणामुळे त्यांचा मुलगा प्रिन्स याच्या डाव्या हाताला व बोटाला रक्तपुरवठा होत नसल्याने डावा हात निकामी झाल्याने दंडातून काढून टाकण्यास कारणीभूत झाल्याने त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
केईएममधील शॉर्टसर्किट प्रकरण : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, प्रिन्सच्या वडिलांनी केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 11:40 PM