लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉरिस नरोन्हाने गोळीबारासाठी सुरक्षा रक्षक अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. मिश्राने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फुलपूर पोलिस ठाण्यातून शस्त्र परवाना मिळवला होता. मात्र, त्याची नोंदणी मुंबई पोलिसांकडे केली नव्हती. त्यानुसार, मिश्राला याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. मॉरिसचा पीए मेहुल पारेख याची आई करुणा रुग्णालयात उपचार घेत होत्या. घटनेच्या दिवशी मॉरिसने मिश्राला पारेखसोबत पाठवल्याचे तपासात समोर येत आहे.
मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला अमरेंद्र मिश्रा सुरक्षा रक्षक म्हणून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मॉरिसकडे कामाला होता. त्याने २००३ मध्ये शस्त्र परवाना मिळविल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहे. कागदपत्रांनुसार २०२६ पर्यंत परवाना होता. या कागदपत्रांची पोलिसांकडून खातरजमा करण्यात येत आहे. मिश्रा काम संपविल्यानंतर बंदूक मॉरिसच्या कार्यालयातील पोटमाळ्यावरील लॉकरमध्ये ठेवून जात होता. त्याने मॉरिसलाही ते वापरण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, मॉरिसने याच बंदुकीतून गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या करत स्वतः आत्महत्या केली आहे. स्वतःची बंदूक दुसऱ्याच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी शस्त्र परवाना कायदा २९ बी कलम ३० अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात मिश्राला अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत पाच ते सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आली आहे.