विमानात मद्य सेवा द्यायलाच हवी का?; फ्रिक्वेंट फ्लायर्समध्ये मतमतांतरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:31 AM2023-01-08T06:31:35+5:302023-01-08T06:31:41+5:30
बहुतांश लोकांचा सूर हा विमानात मद्य हवेच कशाला, याच बाजूने असल्याचे दिसून येते.
- मनोज गडनीस
मुंबई : एअर इंडियाच्या विमानात शंकर मिश्रा या प्रवाशाने केलेल्या गैरप्रकारानंतर एअर इंडियाने आता विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करणार असल्याचे सूतोवाच केल्याने त्याचे पडसाद आता नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश लोकांचा सूर हा विमानात मद्य हवेच कशाला, याच बाजूने असल्याचे दिसून येते.
समीर सुलतान : लोकांना मद्यपान झेपत नसेल आणि ते विमानात गोंधळ घालणार असतील, तर विमान कंपन्यांनी मद्य कशाला द्यायचे?
अक्षय रहाणे : मुळात विमान कंपन्यांनी प्रवासादरम्यान मद्य देण्यामागे काय तर्क आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
अमिषा नारायण : देशांतर्गत विमान प्रवासात ज्याप्रमाणे विमानात मद्य दिले जात नाही तसेच भारतीय विमान कंपन्यांनी परदेशातील प्रवासातही मद्य सेवा बंद करावी.
निखिल कुलकर्णी : तिकिटाच्या किमतीमध्ये विमानातील मद्य आणि खानपानाचा समावेश असतो. जर मद्यबंदी केली तर विमान प्रवासाचा खर्च किरकोळ स्वरूपात का होईना पण कमी होईल. जो प्रवासी मद्य पीत नाही त्याच्यासाठी हा भुर्दंड नाही का?
स्वप्निल जोशी : बस, रेल्वे किंवा बोटीच्या प्रवासात मद्य दिले जाते का, मग विमान प्रवासातच मद्य कशाला द्यायचे, मद्यप्राशन करून लोकांनी काही गोंधळ केला तर त्यांनाही त्रास आणि अन्य प्रवाशांनाही त्रास, त्यामुळे कशाला हवे मद्य?
चेतन आगाशे : हवाई प्रवासात देण्यात येणारी सेवा ही त्यांच्या आदरातिथ्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मद्य देण्यास काय हरकत आहे. तसेच अशा प्रवासादरम्यान दोनपेक्षा जास्त ड्रिंक न देण्याचा विमान कंपन्यांचा नियमही आहे. त्यामुळे उगाच बाऊ करण्यात येत आहे.
समीधा राजे : एका कुटुंबातील तीन सदस्य एकत्र प्रवास करत असतील आणि त्यातील दोन जण मद्यप्राशन करत नसतील तर त्या लोकांच्या वाट्याचे मद्य अन्य व्यक्तीला न देता कुटुंबाच्या सदस्याला द्यावे यावरून विमान कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचे प्रकार मी अनुभवले आहेत.