कुलगुरूंची न्यायालयीन चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:11 AM2017-07-27T04:11:36+5:302017-07-27T04:11:40+5:30
मुंबई विद्यापीठात पेपर फुटणे, निकाल आठवडाभर उशिरा लागणे, असे प्रकार घडतात, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, इतका निकालांना उशीर कधीच झालेला नाही.
मुंबई : मुंबई विद्यापीठात पेपर फुटणे, निकाल आठवडाभर उशिरा लागणे, असे प्रकार घडतात, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, इतका निकालांना उशीर कधीच झालेला नाही. यंदा मुंबई विद्यापीठाचे १६०वे वर्ष आहे. हे संपूर्ण वर्ष साजरे करायला हवे, पण सध्या ज्या प्रकरणामुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत आहे, ही बाब खेदजनक आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी केली.
मुंबई विद्यापीठात २०१३ साली अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत सुरू केली. अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी योग्य पद्धतीने होत आहे. त्यानंतर, येत्या एप्रिल महिन्यांत कुलगुरूंनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासल्या जातील, अशी घोषणा केली. अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी ज्या कंपनीकडे कंत्राट आहे, त्या कंपनीचा विचार केला गेला नाही. नवीन कंपनीला कंत्राट देऊन कामाला सुरुवात केली. यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व प्रकाराची कुलगुरूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, तसेच त्यांची न्यायालयीन चौकशी करावी. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी. प्र-कुलगुरूंची नेमणूक करावी, अशी मागणी मुणगेकर यांनी केली आहे.
डॉ. मुणगेकर यांनी कुलगुरूंच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. कुलगुरूंच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कुलपतींना या प्रक्रियेत हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी निकालासाठी ३१ जुलैची डेडलाइन दिली आहे. कुलगुरूंनी ही डेडलाइन पाळली अथवा नाही पाळली, तरीही त्यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा द्यायला हवा. कुलगुरूंप्रमाणेच राज्य सरकारलादेखील चांगले खडेबोल सुनाविले. नवीन विद्यापीठ कायदा आणताना १९९४ च्या कायद्यानुसार विद्यापीठात असलेली सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल आणि अॅकेडमिक कौन्सिल का बरखास्त करण्यात आले? याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळाला राज्य सरकारदेखील तेवढेच जबाबदार असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. तत्काळ विद्यापीठावर प्रशासक नेमण्याची मागणीही त्यांनी केली. तर ज्या पद्धतीने विद्यापीठात मनमानी पद्धतीने कामकाज सुरू आहे, तेदेखील चुकीचे आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
परीक्षा विभागाची तयारी
दुसरीकडे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी कमी वेळेत अधिक मदत कशी करता येईल, यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा विभाग अंदाज घेत आहे. कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ (विधि) अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाईन पद्धतीने मागवून घेऊन त्यांची पात्र प्राध्यापकांकडून तपासणी केली जाऊ शकत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई विद्यापीठ हे स्वायत्त आहे, याचा अर्थ स्वतंत्र असा होत नाही. सध्या कोणतीही कौन्सिल, सिनेट अस्तित्वात नसल्याने, कुलगुरूंच्या एकहाती सत्ता आहे. शिक्षणमंत्रीही विद्यापीठ स्वायत्त असल्याचे म्हणतात. हे चुकीचे आहे, असे म्हणत मुणगेकर यांनी शिक्षणमंत्र्यांवर टीका केली.
गुणपत्रिकांचे काय?
मुंबई विद्यापीठ डेडलाइन पाळण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करेल, पण गुणपत्रिकांचे काय? त्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार, अनेक विद्यार्थ्यांच्या परदेशातील अभ्यासाची संधी हुकू शकते,
अशी भीती विद्यार्थ्यांना आहे.
निकाल लावण्याबाबतचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ मदतीचा हात देणार आहे. काही विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहाय्य करण्याची विद्यापीठाची तयारी आहे, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी येथे सांगितले. विद्यापीठाच्या अधिसभेनंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे. त्यामुळे मदतीसाठी तयार असल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थी हित लक्षात घेऊन कुलपतींच्या सूचनेनुसार राज्यातील काही अन्य विद्यापीठांबरोबरच मुंबई विद्यापीठानेही मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, शिवाजी विद्यापीठातील दुसºया सत्रातील ६२० परीक्षांपैकी ५७२ परीक्षांचे निकाल बुधवारअखेर विद्यापीठाने जाहीर केले आहेत. वीस अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. ही स्थितीत लक्षात घेता विद्यापीठाचे परीक्षा आणि निकालाबाबतचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाला ‘मुंबई’ला मदतीचा हात देणे शक्य आहे.