कारावासाऐवजी नजरकैदेत ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:08+5:302021-09-03T04:06:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याला कारागृहाऐवजी ...

Should be kept in custody instead of imprisonment | कारावासाऐवजी नजरकैदेत ठेवावे

कारावासाऐवजी नजरकैदेत ठेवावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याला कारागृहाऐवजी नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आपले वय व असलेले आजार पाहता आपल्याला नजरकैदेत ठेवण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती नवलखा यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची वैद्यकीय चाचणी टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या खारघर रुग्णालयात शुक्रवारी करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले. नवलखा सध्या तळोजा कारागृहात आहेत.

गौतम नवलखा (६९) यांनी त्यांच्या छातीत असलेल्या गाठीची वैद्यकीय चाचणी जसलोक रुग्णालयात करण्याची परवानगीही न्यायालयाकडून मागितली आहे. मात्र, एनआयए व राज्य सरकारने त्यावर आक्षेप घेतला. ‘देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक टाटा रुग्णालयात उपचार घेण्याकरिता येतात. कर्करोगावर उपचार करणारे हे देशातील उत्तम रुग्णालय आहे. त्यामुळे त्यांना तिथे गाठीची वैद्यकीय चाचणी करू द्या’, असे एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठाला सांगितले.

नवलखा यांची बहीण जसलोकमध्ये परिचारिका आहे. राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, तरीही जसलोकमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यास एनआयए व राज्य सरकारचा विरोध का? असा युक्तिवाद नवलखा यांच्यातर्फे ॲड. युग चौधरी यांनी केला.

तसेच नवलखा यांना कारागृहात राहून ‘हायपर टेन्शन’चाही त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी, असे चौधरी यांनी म्हटले. त्यावर सरकारी वकील संगीता शिंदे यांनी नवलखा यांच्या छातीतील गाठीची वैद्यकीय चाचणी टाटा मेमोरिअलच्या खारघर रुग्णालयात शुक्रवारीच करू, असे आश्वासन न्यायालयाला दिले.

न्यायालयाने ते मान्य करत एनआयएला या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले, तसेच या याचिकेवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली.

Web Title: Should be kept in custody instead of imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.