शिक्षणाचे कंत्राटीकरण करायचे आहे का?; शिक्षकांच्या आउट सोर्सिंगवर शिक्षण क्षेत्रातून प्रचंड नाराजी
By सीमा महांगडे | Published: March 15, 2023 09:35 PM2023-03-15T21:35:54+5:302023-03-15T21:36:25+5:30
शासनाला शिक्षणाचे कंत्राटीकरण करायचे आहे का असा प्रश्न शिक्षक मुख्याध्यपक उपस्थित करीत आहेत.
मुंबई: शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयात प्रशासनावरील खर्च कमी करण्यासाठी ७४ प्रकारची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला असून त्यात शिक्षक पदाचाही समावेश केल्याने शिक्षणक्षेत्रात याबाबत प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
शिक्षणासारख्या निरतंत्रचालणाऱ्या प्रक्रियेत कंत्राटी शिक्षक भरल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेसह इतरही प्रश्न निर्माण होतील अशा प्रतिक्रिया शिक्षक , मुख्याध्यपक देत आहेत. एकीकडे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांना वेतनवाढ, इंसेंटीव्ह देण्याबाबत शिफारशी केल्या आहेत तर दुरीकडे कंत्राटी शिक्षक भरून शासन नवीन शैक्षणिक धोरणाला हरताळ फासत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत. शासनाला शिक्षणाचे कंत्राटीकरण करायचे आहे का असा प्रश्न शिक्षक मुख्याध्यपक उपस्थित करीत आहेत.
राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, त्यावर जर शासन कंत्राटी शिक्षक भरती करणार असेल तर शिक्षकांना संपवण्याचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया राज्य विना अनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबईचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली. शासनाचा हा धमकीवजा तुघलकी निर्णय असून शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कंत्राटी शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिक्षणातील स्थैर्य कसे देणार ? यामुळे शिक्षणाच्या दर्जावर तर परिणाम होईलच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर ही परिणाम होणार असल्याने शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मुंबई मुख्याध्यपक संघट्नेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली. केवळ प्रशासनावरील आर्थिक भार कमी व्हावा म्हणून भावी पिढीच्या भवितव्यासाठी शासनाने कंत्राटी शिक्षक भरती करून खेळू नये अशी प्रतिक्रिया मुंबई अध्यापक संघाचे अनिल बोरनारे यांनी दिली आहे.
उत्तरपत्रिका तपासणी नाहीच
जुन्या पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा बुधवारी दुसरा दिवस होता. बुधवारी ही दहावीचा पेपर सुटल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई संघटनेने जोगेश्वरी येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयावर जोगेश्वरी येथै १०० हून अधिक शिक्षकांनी निदर्शने केली. तसेच मंगळवारी, बुधवारी शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या कारणास्तव शिक्षकांनी संयम दाखवला असला तरी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आणि निदर्शनाच्या माध्यमातून आंदोलन तीव्र होऊ शकते असा इशारा राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.
कंत्राटी शिक्षकभरती म्हणजे खासगीकरणाची नांदी असून अनुदानित शिक्षण व शिक्षक याना नख लावण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे गरिबांचे शिक्षण अडचणीत येणार आहे आणि शिक्षण क्षेत्रावर भयावह प्रिं दिसून येतील- जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती
संपाचा शाळांच्या वर्गावर ही परिणाम
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका शाळा, कॉलेजांतील नियमित वर्गांना बसला आहे. अनेक ठिकाणी नियमित वर्ग भरू शकले नाहीत परिणामी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली. मुंबईतील चेंबूर येथील आदर्श विद्यालय, गोवंडीतील अमरनाथ हायस्कूल, कुर्ल्यातील होली क्रॉस हायस्कूल, भांडुप येथील शिवाजी विद्यामंदिर, मानखुर्द येथील मोहिते पाटील विद्यालय, विक्रोळीतील विद्यामंदिर हायस्कूल, दादर येथील सेंट अँटनिया डिसिल्व्हा स्कूल, काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची शाळा येथे सह्या पहिली ते नववीचे वर्ग बंद आहेत.