मुंबईत नाही, पण किमान उपनगरात तरी फ्लॅट हवा; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 12:50 PM2023-10-28T12:50:35+5:302023-10-28T12:52:20+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फ्लॅट नोंदणीत ३७ टक्क्यांनी वाढ.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुंबईत एकूण ४५९४ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांपोटी राज्य सरकारच्या तिजोरीत ४३५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. २०२२ मध्ये या कालावधीमध्ये एकूण ३३४३ मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत ही वाढ ३७ टक्के अधिक आहे.
प्रत्यक्ष मुंबई शहरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी किमान उपनगरात तरी घर घेता येईल का, याची चाचपणी लोक करत आहेत. आगामी काळात असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोक नव्या घरासाठी विक्रमी बुकिंग करू शकतील, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील लोकांना आहे.
नऊ दिवसांत झालेल्या मालमत्तांच्या नोंदणीमध्ये सर्वाधिक प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे. त्या तुलनेत नवे कार्यालय अथवा व्यावसायिक मालमत्तांचे प्रमाण कमी आहे. एकूण मालमत्ता नोंदणीत निवासी मालमत्तांचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे, तर उर्वरित १८ टक्के प्रमाणे हे व्यावसायिक कार्यालये, दुकानांचे गाळे आदीचे आहे.
ऑफर्सचा धमाका
नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने गृहखरेदीने वेग पकडल्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. दिवाळीचे निमित्त साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींनी अनेक आकर्षक योजना सादर केल्या आहेत.
१०, ५०, ४० योजना...
यानुसार, ज्यांना घर खरेदी करण्यात रस आहे अशा लोकांना घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरून घराचे बुकिंग करता येईल. त्यानंतर वर्षभरात ५० टक्के रक्कम भरायची असून इमारत पूर्णत्वास येण्याच्या जवळपास उर्वरित ४० टक्के रक्कम भरण्याची योजना आहे.
व्यवहारांचा उच्चांक
चालू वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत मुंबईत तब्बल १ लाख मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी झाली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. २०२२ मध्ये संपूर्ण वर्षात मुंबईत एकूण १ लाख २२ हजार मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले होते. त्या तुलनेत यंदा पहिल्या दहा महिन्यातच मालमत्तेतील व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे.
पितृपक्षात मागणी घटली होती; पण...
- बांधकाम उद्योगातील अग्रगण्य संशोधन संस्था असलेल्या नाइट फ्रँक कंपनीने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांत दिवसाकाठी ५१० मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले आहेत.
- यंदा १५ ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू झाले. त्या अगोदरच्या १४ दिवसांत दिवसाकाठी २३१ मालमत्तांची नोंदणी झाली होती.
- त्या कालावधीमध्ये पितृपक्ष असल्याने नोंदणी घटली होती. मात्र, नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेकांनी नव्या मालमत्तांची नोंदणी केल्याचे दिसून आले.