मलबार हिल जलाशय तोडायचा की बांधायचा? ठरविण्यासाठी नेमले तज्ज्ञांचे मंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:51 PM2023-11-02T12:51:48+5:302023-11-02T12:52:07+5:30
मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद सध्या चिघळला आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम ही रखडले आहे.
मुंबई :
मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद सध्या चिघळला आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम ही रखडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता पालिका अधिकाऱ्यांसोबत घेऊन काही तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी आवश्यक आहे की, त्याची दुरुस्ती किंवा डागडुजी होऊ शकते, याचा अहवाल पुढील महिन्यात सादर करणार आहे.
मलबार हिल जलाशय कामासाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार आहेत. तसेच या कामामुळे हँगिंग गार्डन काही वर्षे बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक, पर्यावरणवादी झाडे हटवण्यास विरोध करीत आहेत. जलाशयाची दुरुस्ती किंवा डागडुजी होऊ शकते, याचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
लोढा यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत इतर महत्त्वाच्या विषयांसोबत मलबार हिल जलाशयाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीला पालिका अधिकाऱ्यासोबत, अभियंते, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमीही उपस्थित होते.
हँगिंग गार्डन बंद नको
हे उद्यान सात वर्षांच्या कालावधीसाठी बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे जलाशयाच्या बांधकामाच्या वेळी उद्यान बंद न ठेवता ते सुरू असावे, अशी ही मागणी स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून केली आहे.
समितीमध्ये कोण?
स्थापन होणाऱ्या समितीमध्ये आयआयटीच्या संचालकांनी नियुक्त केलेले तीन प्राध्यापक आणि महापालिकेतर्फे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्यावतीने प्रतिनिधी असणार आहेत. या अहवालामध्ये स्थानिक नागरिकांसह, तज्ज्ञांच्या मतांचा सहभाग असणार आहे.
नागरिकांच्या सूचना
मलबार हिल जलाशयाची जी टाकी ९१ दशलक्ष लिटरची बांधण्याचे प्रस्तावित आहे, त्याऐवजी ती २३ किंवा २७ दशलक्ष लिटरपर्यंत बांधण्याचा विचार व्हावा. यामुळे छोट्या टाकीसाठी लागणारी जागा व पर्यायाने होणारी पर्यावरण हानी कमी होईल, हा पर्याय पुढे आला. या शिवाय जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले तर ते टप्प्याटप्प्यात व्हावे, असे नागरिकांनी सुचविले आहे.