मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात येणार आहेत. त्यामुळेच, सरकारने दिलेलं वचन राज्यकर्ते पाळतील का, मराठा समाजाला आरक्षण मिळेल का, याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी भूमिका मांडली. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. इंडिया आघाडी, भाजपला विरोध, अजित पवार गट यांसह अनेक मुद्यांवर उत्तरे दिली.
भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षांची आघाडी आहे. शेतकरी कामगार पक्षासारखे काही आणखी पक्षही येतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी, अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार असल्याचा टोला पवारांनी हाणला आहे. फडणवीसांच्या विधानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. यावेळी, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारकडे बोट दाखवलं.
एकीकडे खासगीकरण आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा चॉकलेट दिलं जातंय, ते कुठपर्यंत टिकेल? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, आत्तापर्यंतचे मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल अनुकूल राहिलेले नाहीत. ज्याअर्थी सध्याचे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी, एखाद्या विशिष्ट कालावधीत हा निर्णय घेऊ, असा शब्द उपोषणकर्त्यांना दिला होता, त्याला काय आधार आहे हे आम्हाला माहिती नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिलं. तसेच, मराठा समाजात कुणबी प्रमाणपत्रावरुन दोन मतप्रवाह आहेत. यातून मार्ग कसा काढावा? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही पवार यांनी भूमिका मांडली. या संदर्भात मार्ग काढण्याची जबाबदारी आमची नाही. त्यासंदर्भातील जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे, कारण जरांगे पाटलांचं उपोषण सोडताना त्यांनी तो शब्द दिला होता, असं दिसतंय. बघुया काय होतंय, ते असे म्हणत मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भूमिका व्यक्त केली.
भुजबळांनी खोटं मान्य केलं
छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. आमच्यातील काही लोकांचा भाजपासोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण, त्यांनी स्वीकारला नाही. त्यापुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती. आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे शरद पवार म्हणाले.
बावनकुळेंवर बोचरी टीका
५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकू असे बावनकुळे म्हणाले होते. यावर विचारले असता बावनकुळेंना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना स्वत:ला पक्षाने संधीदेखील दिली नाही, त्या माणसाला काय महत्व द्यायचे, असा टोला पवारांनी हाणला. देशात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शाळाही दत्तक देऊ लागल्याने खाजगी लोक त्याचा गैरवापर करतील अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.