एनसीबीचा सवाल; उच्च न्यायालयात अपील दाखल; सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करताना लाइसर्जिक ॲसिड डायथिलामाइड (एलएसडी)चे वजन कागदासह मोजावे की नाही? हा प्रश्न सोडवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी आरोपी असलेला अनुज केशवानी याने केलेल्या अर्जावर विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला एनसीबीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. केशवानीकडून जप्त केलेल्या एलएसडीचे वजन हे बोल्ट पेपरसह आहे की पेपरशिवाय केले आहे, याची खात्री करण्यासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयाने एनसीबीला एलएसडीचे नमुने गुजरातच्या गांधीनगर एफएसएल लॅबमध्ये पाठविण्याचे आदेश दिले हाेते. अपिलावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती एनसीबीने उच्च न्यायालयात केली. न्या. अजय गडकरी यांनी या याचिकेवर बुधवारी सुनावणी ठेवली आहे.
दोषारोपपत्रात केशवानीकडून जप्त केलेल्या एलएसडीचे वजन ०.६२ ग्रॅम असल्याचे नमूद आहे. एनडीपीएस कायद्यानुसार, एलएसडीसाठी ०.१ ग्रॅम वजन हे व्यावसायिक प्रमाण मानण्यात येते. मात्र, एलएसडीचे वजन पेपरसह धरण्यात आले की पेपरविना, हे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलेले नाही.
एलएसडीचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे एलएसडी सोल्यूशनचा थेंब वाळलेल्या कागदाच्या तुकड्यावर, जिलेटीन पेपर किंवा ब्लॉटिंग पेपर्सवर टाकण्यात येतो. त्यामुळे ड्रग्स ज्या प्रकारात विकण्यात येते त्याचेही वजन करण्यात येते, असे एनसीबीने म्हटले आहे. त्यामुळे एलसीडीचे वजन करताना पेपरसह वजन गृहित धरावे, अशी विनंती एनसीबीने केली आहे.
..........................