Join us

लोकांनी ठरवावे लॉकडाऊन हवे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:07 AM

मुंबई पालिका आयुक्तांचा मुंबईकरांना इशारा : आढावा घेऊन निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने ...

मुंबई पालिका आयुक्तांचा मुंबईकरांना इशारा : आढावा घेऊन निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधितांचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार, अशी चर्चा सुरू आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने चाचणीचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मात्र, घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा देतानाच नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, अशी सूचनाही आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. आता लोकांनी ठरवावे त्यांना लॉकडाऊन हवा का? असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या मुंबईत अतिदक्षता विभागात ६५० खाटा व २५० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तसेच खाटा वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील १५ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, कोविड निर्बंधांचे पालन नागरिकांनी केले नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे आयुक्तांनी सांगितले.

...तर बंधने दिवसाही लागू होतील

नियमांचे पालन होत नसेल, धोका कायम राहणार असेल तर राज्यात सध्या जे नियम रात्री लागू आहेत, ते दिवसाही लावावे लागतीत, अशा शब्दात वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लाॅकडाऊनचे संकेत दिले. अस्लम शेख म्हणाले की, कोरोनाला थोपवण्यासाठी नियोजन कसे करायचे याबद्दल टास्क फोर्स काम करत आहे. राज्यात, मुंबईत लॉकडाऊन हवे की नको हे आता लोकांच्या हातात आहे. लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन लागू होणार नाही. भाजप केवळ राजकारण करत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा विषय राजकीय प्रश्न बनू शकत नाही, असे शेख म्हणाले. कोरोना संसर्गात एकाच वेळी लोकांना त्यांचे उद्योग सांभाळायचे आहेत. तसेच जीवसुद्धा वाचवायचा आहे. झोपडपट्टी भागापेक्षा मोठ्या इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, असेही शेख म्हणाले.