मुंबई : प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या समस्या असतात, पण म्हणून त्या समस्यांनी देशाची ओळख होत नसते. आपण आपल्या राज्याविषयी अभिमान बाळगतो, तो आपल्या बोलण्यातूनही प्रतित होत असतो. मात्र, भारताविषयी बोलताना आपण त्यात काहीसे कमी पडतो. आपल्या देशाविषयी आपण त्याच तळमळीने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी केले.
डिफाइन आर्ट्स प्रा. लि. आणि स्पंदन प्रकाशन समूहाच्या वतीने रविवारी सायंकाळी दीपा कुलकर्णी लिखित ‘युरोप : इट जस्ट हॅपनड्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, बुकगंगाचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, क्रॉसवर्डचे प्रकाशन प्रमुख अनुप जेरजानी आणि जर्मन दूतावासाचे फायनान्शियल काऊन्सिलर व जर्मन फेडरल बँकेचे प्रतिनिधी पीटर कर्न मंचावर उपस्थित होते, तर ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, अशोक हांडे यांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. मान्यवरांच्या हस्ते ‘युरोप : इट जस्ट हॅपनड्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ऋषी दर्डा म्हणाले की, प्रादेशिक भाषांना कायम स्थान मिळाले पाहिजे आणि त्याचा विस्तार झाला पाहिजे, या विचारांचा मी आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइल हा ‘ग्लोबल मित्र’ होत आहे, त्यामुळे जागतिक स्तराचा विचार करता, इंटरनेटवरील माहितीचा वापर सर्वांत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये होतो आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी पुस्तकाविषयी सांगितले की, दीपा कुलकर्णी यांना ‘लेडी कोलंबस’ म्हटले, तर वावगे ठरणार नाही. एकटीने प्रवास करून लिहिलेल्या या पुस्तकातून त्यांनी अनुभव समृद्धतेचं सार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवासातून दीपा यांनी दाखवून दिले आहे की, अज्ञानाची भीती जोवर आपण दूर सारत नाही, तोवर आपल्या आत्मविश्वाला बळ येत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकांना प्रवासाची प्रेरणा मिळेल, हे निश्चित आहे.
आपल्या प्रवासाच्या अनुभवाविषयी सांगताना अभिनेते महेश मांजरेकर यांनी सांगितले की, आपण मुंबई-भारतात राहतो़ त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहू शकतो. प्रवासादरम्यान जशी चांगली माणसे भेटतात, तशी वाईट माणसेही भेटतात, पण कायम चांगले अनुभव आपण गाठीशी ठेवावेत, तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले की, दुसºया देशांमध्ये फिरलो, प्रवास केला की आपण आपल्या देशात किती जबाबदारीने वागलो पाहिजे याचे भान येते. स्वत:चा शोध घेण्यासाठी गर्दीपासून लांब जात प्रत्येकाने प्रवास केला पाहिजे. अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर हिने सांगितले की, शूटिंगच्या दौºयादरम्यान भेटणाºया अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांमध्ये बºयाचदा पात्र लपलेली असतात आणि मग तीच माणसे अभिनयातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, त्यातून ते पात्र अधिकाधिक जिवंत होत असते. त्यामुळे प्रवासानंतर आपण वेगळे व्यक्ती म्हणून घडत असतो, हा महत्त्वाचा बदल आहे. त्याचप्रमाणे, अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले की, बाहेरच्या देशात ज्याप्रमाणे मागील काळाच्या, जुन्या माणसांच्या स्मृती जपल्या जातात. ती जपण्याची ओढ आपल्याकडे कमी आहे. त्याची प्रक्रिया सरकारपासून सुरू व्हावी लागते. मात्र, आपल्या येथे याविषयी कमालीची निराशा आहे. याकरिता, ‘संस्कृती’ माहीत असणारा सांस्कृतिकमंत्री असणे गरजेचा आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठेही प्रवास केला, तरी मातीशी नाळं जोडून ठेवायला हवी. कारण तीच आपल जगणं समृद्ध करत असते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केलेचौकट मोडायला हवीखान्देशातल्या एका छोट्या गावात माझा जन्म झाला. बाबांच्या कामानिमित्त खूप गावे-शहरांत बदली झाल्याने फिरले होते. आयुष्यभर स्वत:साठी असे काही केले नव्हते. हा संपूर्ण प्रवास अनिश्चित होता, याचे काही नियोजन केले नव्हते. या प्रवासाच्या निमित्ताने स्वत:भोवतालची चौकट मोडण्याचं धाडस केलं. आज या प्रवासाने मला खूप समृद्ध केलं आहे.- दीपा कुलकर्णी, लेखिका