'वैभव नाईकांनी देवावर हात ठेऊन सांगावं?' शिवसेना प्रवेशाबद्दल राणेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:02 AM2023-03-24T10:02:02+5:302023-03-24T10:02:45+5:30
वैभव नाईक यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर स्वत: त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.
मुंबई - शिवसेनेते दोन गट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. सिंधुदुर्गमध्येही मोठे बदल करत आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या नियुक्तिमध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आमदार वैभव नाईक शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर, आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश खासदार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
वैभव नाईक यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर स्वत: त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. 'मी नव्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले आहेत. मी उद्धव ठाकरे यांचा प्रमाणिक कार्यकर्ता आहे. मी ठाकरे गटाला सोडून कुठेही जाणार नाही, असं स्पष्टीकरण आमदार नाईक यांनी दिलं. त्यानंतर, आता निलेश राणे यांनी व्हिडिओ शेअर करत वैभव नाईकांनी निष्ठेच्या गोष्टी करु नयेत, असं म्हटलंय. तसेच, नाईक हे वारंवार एकनाथ शिंदेंना भेटले असून अनेक कामे त्यांनी करुन घेतलीत, याबद्दल त्यांनी खुलासा करावा असा गौप्यस्फोटच राणेंनी केलाय.
वैभव नाईकांनी निष्ठेच्या गोष्टी करु नयेत, मी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही, या बोगस वार्ता करु नयेत. त्यांचा आणि निष्ठेचा काय संबंध तरी आहे का. या अगोदर वैभव नाईक एकनाथ शिंदेंना कितीवेळा भेटलाय, काय काय कामं करुन घेतलीत. कधी-कुठे-कसा भेटलास हे अनेकांना माहितीय, त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही, असे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबद्दल मोठा खुलासा केलाय.
उद्धव ठाकरे गट आमदार वैभव नाईक यांचा निष्ठा या विषयाशी काही संबंध नाही. pic.twitter.com/BUA4eRxXFp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 23, 2023
शिवसेना पक्षप्रवेशाबद्दल जेव्हा वैभव नाईकांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले, राणेंचं काय? जर कुडाळ-मालवण मधून राणे निवडणूक लढवणार नसतील, किंवा मला या मतदारसंघातून तिकीटाची खात्री देत असाल तर मी १०० टक्के तुमच्याकडे येतो, हे वैभव नाईकांनी बोललंय का नाही, हे कुठल्याही मंदिरात येऊन सांगावं, जिथं बोलवाल तिथं देवावर हात ठेऊन सांगावं की, ही चर्चा झाली का नाही, असे म्हणत निलेश राणेंनी गौप्यस्फोटच केलाय. तसेच, स्वत:चं राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी, उद्धव ठाकरेंशी त्यांना काहीही घेणं-देणं नाही. आम्ही काँग्रेसमध्ये गेलो म्हणून तो शिवसेनेत आहे. अन्यथा याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटलं.
वैभव नाईकांचं स्पष्टीकरण
'जिल्हा प्रमुख या पदी नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचे मीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मला सगळीकडे फिरायचे आहे. मला उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहायचे आहे. गेल्या आठ दिवसापूर्वीच हे पद दिले आहे, असंही वैभव नाईक म्हणाले. 'माझी गरज विरोधकांना आहे हे यावरुन दिसून येतंय. मी नाराज नाही, दोनवेळा मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कधी नाराज झालो नाही आणि आता जिल्हा अध्यक्षपदावरुन मी का नाराज होऊ, असे स्ष्टीकरण आमदार नाईक यांनी नाराजीसंदर्भात दिले आहे.