"आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता?" आदित्य ठाकरे यांचा सवाल

By जयंत होवाळ | Published: July 18, 2024 07:25 PM2024-07-18T19:25:24+5:302024-07-18T19:25:36+5:30

Mumbai News: रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्यानंतर आता पुन्हा अधिकच्या खर्चासाठी निविदा मागवण्यात येणार असून आम्ही पुन्हा एकदा यांचा घोटाळा उघड करण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले आहे.

"Should we expose the road scam, or do you expose it yourself?" asked Aditya Thackeray | "आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता?" आदित्य ठाकरे यांचा सवाल

"आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता?" आदित्य ठाकरे यांचा सवाल

- जयंत होवाळ
मुंबई  - रेसकोर्स नंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्यानंतर आता पुन्हा अधिकच्या खर्चासाठी निविदा मागवण्यात येणार असून आम्ही पुन्हा एकदा यांचा घोटाळा उघड करण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले आहे. त्याचबरोबर भाजप-मिंधे राजवटीच्या कंत्राटदार मित्रांसाठी पालिका मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही, असेही ठणकावले आहे. आमचे सरकार आल्यावर या घोटाळ्यांची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी समाज माध्यमांवरील पोस्टमधून दिला आहे.

ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून त्याची उत्तरे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.  २०२३-२४ शाळातील रस्त्यांच्या कामाचा ६०८० कोटी रुपयांचा  घोटाळा आम्ही उघड केला होता. पालिकेला कंत्राटदारांना खूश करायचे असल्याने २०२२ ह्या वर्षात रस्त्यांच्या कामाच्या निविदाच रद्द केल्या होत्या.  ज्या कंत्राटदारांनी कामाला विलंब केला,  कामे   सुरू केलेली  नाहीत  त्यांच्यावर काय कारवाई केली , जानेवारी २०२३ च्या निविदेची रक्कम आणि जाहीर केलेली आगाऊ रक्कम कंत्राटदारांना अदा केली गेली की नाही, याच निविदा घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का, अशा सवालांच्या फैरी आदित्य यांनी झाडल्या आहेत.

भाजप-मिंधे राजवटीच्या कंत्राटदार मित्रांसाठी पालिका मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू शकत नाही.  आमचे सरकार या सर्व कामांना स्थगिती तर देणारच आहे, शिवाय  घोटाळ्यातल्या देयकांचे पैसेही थांबवणार आहे. त्याचबरोबर  या घोटाळ्याची पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी कोणीही असो, त्यांना कडक शिक्षा होईल ह्याची काळजीही घेणार आहोत, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या २ वर्षांपासून पालिका थेट घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या नगरविकास खात्यातर्फे चालवली जात आहे. मुंबईचे १०० कोटी रुपये रेसकोर्सवरील खाजगी मालकीच्या घोड्यांच्या तबेल्यांवर खर्च करण्याच्या मूर्खपणाला पालिकेने मान्यता दिली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचे यंत्र म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी आमची मुंबई आई आहे, जिच्या सेवेसाठी झगडणे  आमच्या रक्तातच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: "Should we expose the road scam, or do you expose it yourself?" asked Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.