‘आम्ही शिकवायचे की निवडणुकीची कामे करायची?’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:43 AM2023-06-18T07:43:45+5:302023-06-18T07:43:54+5:30
निवडणूक आयोगाच्या कामात मदत करण्यासाठी २०१९ पासून सुमारे ५०० शिक्षक शालेय शिक्षण विभागाने स्वेच्छेने पाठवले होते.
मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा सुरू होताच, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पुन्हा शिक्षकांना निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आम्ही शाळेत शिकवायचे की ही कामे करावयाची, असा सवाल शिक्षक करीत आहेत.
निवडणूक आयोगाच्या कामात मदत करण्यासाठी २०१९ पासून सुमारे ५०० शिक्षक शालेय शिक्षण विभागाने स्वेच्छेने पाठवले होते. तेव्हापासून हे शिक्षक निवडणूक आयोगाचे काम करत आहेत. या अतिरिक्त शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाने काल-परवापासून मनपाच्या प्राथमिक शाळांत पाठवल्याने आयोगाला कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्याने त्यांनी पुन्हा शिक्षकांना वेठीस धरून निवडणूक याद्या तयार करण्याचे काम दिले आहे.
मुंबईतील ७० टक्क्यांहून अधिक शिक्षक उपनगरातील रहिवासी असून प्रवासात त्यांचा दोन-अडीच तासांचा वेळ जातो. यामुळे बी.एल.ओ.चे काम करणे शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी दिली आहे.