Join us  

रस्त्यावरून चालतानाही हेल्मेट घालायचे का? नीलम गोऱ्हे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 4:13 PM

Neelam Gorhe : या प्रकरणाची मंत्र्यांनी देखील सभागृहात गंभीरपणे दखल घेत, सदरच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे  सांगितले.

मुंबई : मुंबईसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. ही कामे करत असताना सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत कोणी कोणाचे ऐकत नाही. त्यामुळे घराबाहेर जाताना कोणता अपघात होऊ नये म्हणून लोकांनी सुरक्षेकरिता हेल्मेट घालून फिरायचे का? असा सवाल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. 

वरळी परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावेळी निष्काळजीपणे ५२ व्या मजल्यावरून दोन विटा पडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांनी लक्षवेधी प्रश्नावेळी केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्देश देताना म्हटले की, "शिक्षा झाल्याशिवाय एखाद्याला जबाबदारीची जाणीव होणार नाही. त्यामुळे हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सोपवा. अशा अपघातांबाबत दोषींवर त्वरित  कारवाई करण्यात यावी. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात." 

या प्रकरणाची मंत्र्यांनी देखील सभागृहात गंभीरपणे दखल घेत, सदरच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे  सांगितले. तसेच, सुरक्षा आणि नियमांबाबत मार्गदर्शक सूचना (एस. ओ. पी) तात्काळ बनविण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात वरळीतील फोर सिझन हॉटेलच्या नवीन ६४ मजली इमारतीच्या बांधकामादरम्यान निष्काळजीपणामुळे ५२ व्या मजल्यावरून दोन विटा पडून दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. साबीर अली (३६) आणि इम्रान अली खान (३०) अशी मृताची नावे आहेत. 

टॅग्स :नीलम गो-हेविधान परिषद