मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी, विविध प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडले. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. तर, या भेटीवर काहींनी टीकाही केली. तत्पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केल्यानंतर त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना राज ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. त्यावर, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवा केला आहे.
मनसेनं सुषमा अंधारे यांना खरमरीत पत्र लिहून उत्तर दिले. जसे अंधारे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारले होते, तसेच प्रश्न मनसेने सुषमा अंधारे यांना विचारून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, मनसेचे गजानन काळे यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार करत, उद्धव ठाकरेंनी केलेली १० कामे दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा, असे म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका केली.
शिवसेना हा काँग्रेसने पाळलेला परडीतला नागोबा अस म्हणायचं आणि त्या नागोबाच्या कळपात जावून नागीण आमच्या कपाळावर फुत्कार मारू लागल्या आहेत. तुमचा पक्ष मुबंई महानगरपालिकेच्या सत्तेत असो किंवा राज्याच्या सत्तेत असो, किंवा विरोधी पक्षात असो. तुमच्या, उध्दव ठाकरे यांनी केलेली दहा कामे दाखवा आणि १ लाख बक्षिस मिळवा, असे आव्हान मनसेच्यावतीने देण्यात आलंय, मनसेचे नेते गजानन काळे यांनी व्हिडिओ शेअर करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केलीय. तसेच, तुमचं नेतृत्व केलेलं कार्य दाखवण्यात नापास होईल. उध्दव ठाकरे यांना प्रश्न विचारले तर पळता भुई थोडी होईल ताई, असे म्हणत गजानन काळे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे.
दरम्यान, मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनीही सुषमा अंधारे यांना पत्र लिहून त्यांना अनेक सवाल केले आहेत. तसेच, अंधारे यांच्यावर जबरी टीकाही केली आहे.