Join us  

गृहनिर्माण प्रकल्पांच्या सीएंना ‘कारणे दाखवा’; महारेराने बजावली नोटीस, UDIN चा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:12 AM

आवश्यक असेल तर या सीएंचे प्रबोधन करावे, अशी सूचनाही महारेराने पत्रात केली आहे.

मुंबई - गृहनिर्माण प्रकल्पांचे दैनंदिन व्यवहार पाहणारे आणि ऑडिट करणारे सनदी लेखापाल (सीए) वेगवेगळे असणे गरजेचे असताना काही प्रकल्पांकडून या दोन्ही भूमिका एकाच सीएकडून निभावल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. सीएंना देण्यात आलेल्या यूडीआयएन क्रमांकाचा गैरवापर केला गेल्याचे महारेराच्या झाडाझडतीत निदर्शनास आले आहे.

महारेराने या अनियमिततेची दखल घेतली असून, संबंधित सनदी लेखापालांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. शिवाय बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या या सनदी लेखापालांची नोंद घ्यावी यासाठी अखिल भारतीय सनदी लेखापाल संस्था या शिखर संस्थेला या अनुषंगाने महारेराने पत्र पाठवले आहे. आवश्यक असेल तर या सीएंचे प्रबोधन करावे, अशी सूचनाही महारेराने पत्रात केली आहे.

सीएंचे कर्तव्य काय?

बिल्डरने त्या त्या प्रकल्पाच्या गुंतवणुकीपोटी ग्राहकांकडून आलेल्या पैशांपैकी ७० टक्के रक्कम रेरा नोंदणी क्रमांकनिहाय स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवायला हवी.

बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर हे पैसे काढताना प्रकल्प पूर्ततेची टक्केवारी, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

प्रत्यक्षात बँकेतून पैसे काढताना प्रकल्पाच्या सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले प्रपत्र ३ सादर करावे लागते. याचा तपशील दर ३ महिन्याला रेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे आवश्यक आहे.

बिल्डरला वर्षातून एकदा आर्थिक वर्ष संपल्यानंतर ६ महिन्यांत प्रपत्र ५ मध्ये ऑडिट अहवाल रेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

अपेक्षेलाच हरताळस्वतंत्र सनदी लेखापाल असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात विविध प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने जी माहिती येत आहे, त्यातून ही अनियमितता निदर्शनास आलेली आहे. यामुळे स्वतंत्र सनदी लेखापालाकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मिळण्याच्या अपेक्षेलाच हरताळ फासला गेला आहे.