मनोज गडनीस, मुंबई: परदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअर न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागले अन् त्यात त्यांचा मृत्य झाल्याच्या प्रकरणाची आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटिस जारी केली आहे. या नोटिशीला येत्या ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला दिले आहेत.
१२ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्क येथून मुंबईत एक वृद्ध दाम्पत्य आले होते. त्यांनी विमानतळाबाहेर जाण्यासाठी एअर इंडिया कंपनीकडे व्हीलचेअरच्या सुविधेची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी तिथे केवळ एकच व्हीलचेअर उपलब्ध होती. त्या दोघांपैकी एकाला सोडून मग दुसऱ्याला सोडण्यात येईल, असे कंपनीने या ८० वर्षीय वृद्ध नागरिकाला सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चालणे सुरू केले व इमिग्रेशन विभागात जेव्हा ती व्यक्ती पोहोचली त्यावेळी तिथेच ती कोसळली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.