मुंबई : मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांवरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच वर्षानुवर्ष कायम त्या नाल्यांच्या सफाईची केवळ पाहणी करायची सवय अंगवळणी पडलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिला असून, पालिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या तडकाफडकी कारवाईमुळे पालिका अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिलन सबवे येथे पाहणी करताना येथील नाला अस्वच्छ असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असता त्याची तातडीने दखल घेत पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता यांना त्यांनी जागेवरच कारणे दाखवा नोटीस बजावली.
मुख्यमंत्री उतरले नाल्यातमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः ओशिवरा येथील नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईकडे वळविला व तेथील नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी त्यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या कामाचा आढावाही घेतला. तसेच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारांसोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले.