लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांची जामिनावर सुटका केल्यानंतर त्यांनी जामिनासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी न घेतल्याबद्दल विशेष न्यायालयाने आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
आयसीआयसीआय बँक व व्हिडिओकॉन कर्ज फसवणूक प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर त्यांचे पती दीपक कोचर व वेणुगोपाल धूत हे आरोपी आहेत. धूत यांचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केल्यानंतर त्यांची २० जानेवारी रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एम. आर. पूरवर यांनी १ एप्रिल रोजी कारागृह अधीक्षकांना नोटीस बजावली. धूत यांची तब्येत ठीक नसल्याचे विचारात घेऊन न्यायालयाने त्यांच्या उपस्थितीशिवाय हमी स्वीकारण्याची विनंती मान्य केली. त्यानुसार धूत यांनी वैयक्तिक बंधपत्र आणि रोख बंधपत्र सादर केले.
कारणे दाखवा नोटीस बजावताना न्यायालयाने नमूद केले की, ३१ मार्च रोजी आर्थर रोड कारागृहातून न्यायालयाला मूळ वैयक्तिक व रोख बंधपत्र प्राप्त झाले आहे. मात्र, या दोन्ही कागदपत्रांवर आरोपीची स्वाक्षरी दिसत नाही. त्यामुळे याबाबत मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडून स्पष्टीकरण मागवणे आवश्यक आहे.