मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 07:07 AM2024-05-23T07:07:40+5:302024-05-23T07:09:39+5:30
कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरून शिंदेसेनेतील नेत्यांत अस्वस्थता आहे. त्याला शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे वाट करून दिली.
मुंबई : पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी शिंदेसेनेचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी वक्तव्ये करून उद्धवसेनेची बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी उपनेते शिशिर शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरून शिंदेसेनेतील नेत्यांत अस्वस्थता आहे. त्याला शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे वाट करून दिली. ते म्हणाले, कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर उद्धवसेनेकडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात उमेदवार आहे. ते गजानन कीर्तिकरांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी स्वत:च्या प्रचारासाठी वापरला.
अमोल कीर्तिकर काय म्हणाले?
बाबांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक होता. आता वेगळा निर्णय घेतला, तर तो त्यांचा वैयक्तिक असेल. माझे नाव अमोल गजानन कीर्तिकर हे कायम असणार आहे. ते कोणी चोरू शकत नाही. १० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल, असे अमोल कीर्तिकर म्हणाले.