Uddhav Thackeray : मी हिंदुत्व कधी सोडले हे दाखवून द्या, आता हे व्यासपीठ सोडून जाईन; उद्धव ठाकरेंच ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 08:44 PM2023-04-23T20:44:53+5:302023-04-23T20:54:40+5:30
Uddhav Thackeray : आज सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
"मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन, असं ओपन चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा येथे जाहीर सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले, मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही, अशी टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. मी घरी बसून काम केले म्हणून ही माणसं आज सभेला आली आहेत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाशीला, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असंही ठाकरे म्हणाले.
"राज्यात लवकरच निवडणुका लागतील. या गद्दाराला गाडायचे आहे. मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन. मुख्यमंत्री म्हणून मला शपथ घ्यावी लागली. आमदारांनाही घ्यावी लागते. हे लोक कोरोनात मंदिरे उघडा म्हणून थाळ्या आपटत बसले होते. मी हिंदुत्व सोडणार नाही, माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. भाजपाने त्यांचे हिंदुत्व कोणते ते सांगावे. त्याना आगापिछा काहीच नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
"काही जणांना वाटतं की ते म्हणजे शिवसेना, अरे हाट...यांना जसं घोड्यावर चढवलं होतं, तसं खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या निष्ठेला, भगव्याला कलंक लावला, तो कलंक लावणारे हात आपल्याला काढून टाकायचे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.