मुंबई : अनलाॅक सुरू झाल्यानंतर गुरुवारपासून चित्रपटगृहे सुरू झाली. मात्र, मुंबईत हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी म्हणजे पश्चिम उपनगरातील तुरळक चित्रपटगृहे सुरू झाली असून, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील चित्रपटगृहांत अद्यापही साफसफाई सुरू आहे. शिवाय नवा चित्रपटही प्रदर्शित न झाल्याने चित्रपटगृहे आणि प्रेक्षकही नव्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. कोविडपूर्वीसारखा वेग पकडण्यासाठी चित्रपटगृहांना किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागतील, तरीही मात्र शाे मस्ट गाे ऑन अशी चित्रपटगृह चालकांची भूमिका आहे.राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील एक मल्टिप्लेक्स गाठले. येथील एका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्राप्त माहितीनुसार, आजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटगृहे सुरू झालेली नाहीत. पश्चिम उपनगरात काही ठिकाणी चित्रपटगृहे सुरू झाल्याचे कानावर आले आहे. मात्र पूर्व उपनगरासह शहरात तरी अद्याप पहिल्या दिवशीच पुरेशी हालचाल झालेली नाही. स्वच्छतेबाबत म्हणाल तर सर्वच चित्रपटगृहांत कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. सर्व साहित्य सॅनिटाइज केले जात आहे. फरशांसह उर्वरित सर्व साहित्य धुतले जात आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील याची काळजी घेतली जात आहे.दरम्यान, आजचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी वेग कमी आहे. कालांतराने हा वेग आणखी वाढेल. किमान तीन दिवस तरी सर्वकाही सुरळीत होण्यास लागतील, अशीही माहिती येथून मिळाली.चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांना ५० टक्के आसनव्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल.
शो मस्ट गो ऑन; चित्रपटगृह, मल्टिप्लेक्सचा पडदा उघडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 5:13 AM