Join us

निरुपम यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: January 14, 2016 1:40 AM

काँग्रेस दर्शन’मध्ये प्रकाशित काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या मजकुरामुळे या मासिकाचे संपादक

नवी दिल्ली : ‘काँग्रेस दर्शन’मध्ये प्रकाशित काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या मजकुरामुळे या मासिकाचे संपादक आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाने त्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने याप्रकरणी निरुपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेस दर्शनमध्ये प्रकाशित लेखांबद्दल निरुपम यांना उत्तर देण्यास सांगण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. गुलाम नबी आझाद आणि सुशीलकुमार शिंदे हे या समितीचे सदस्य तर मोतीलाल व्होरा सदस्य सचिव आहेत. काँग्रेसच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या या लेखांमुळे पक्षाला खजील व्हावे लागले होते. या लेखात नेहरूंच्या काश्मीर धोरणावर प्रखर टीका तर सोनिया गांधी यांचे वडील फॅसिस्ट सैनिक होते असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुखपत्राचे संपादक या नात्याने निरुपम यांनी क्षमा मागितली होती. तसेच संपादनाची जबाबदारी सांभाळणारे सुधीर जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली होती. काँग्रेसच्या १३१ व्या वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात ही घोडचूक झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले होते.मुखपत्रात प्रकाशित लेखाची आपल्याला माहिती नव्हती, असा खुलासा निरुपम यांनी केला होता. परंतु मुंबई काँग्रेसमधील काही नेत्यांनी अलिकडेच सोनिया गांधी यांची भेट घेऊन यासंदर्भात तक्रार केली होती. पक्षाचे सरचिटणीस गुरुदास कामत यांचाही या नेत्यांमध्ये समावेश होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)