Join us  

पालिकेच्या सहा डॉक्टर्सना कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: May 24, 2014 1:29 AM

मीरा रोड येथील पालिकेच्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील ६ डॉक्टर्सना कर्तव्यात कसूर केल्यासह रुग्णांशी नीट न वागल्याप्रकरणी प्रशासनाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली

राजू काळे, भार्इंदर- मीरा रोड येथील पालिकेच्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील ६ डॉक्टर्सना कर्तव्यात कसूर केल्यासह रुग्णांशी नीट न वागल्याप्रकरणी प्रशासनाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली. पालिका रुग्णालयात मोठ्या कष्टाने डॉक्टर्स मिळत असताना जे मिळतात त्यांना सांभाळण्यासाठी प्रशासनास कसरत करावी लागते. पालिकेने मीरा रोड येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात ६ डॉक्टर्स नियुक्त केले आहेत. त्यातील डॉ. संजीवकुमार गायकवाड व डॉ. गायत्री राठोड हे पालिकेच्या आस्थापनेवर, तर उर्वरित डॉ. विजया अहिरे, डॉ. राजेश वळवी, डॉ. दिनेश प्रजापती व पूनम गायकवाड हे ठोक मानधनावर कार्यरत आहेत. प्रशासनाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन काही डॉक्टर्स आपल्या सेवेशी एकनिष्ठ न राहता कर्तव्यात कसूर करीत आहेत. तसेच रुग्णांशी फटकून वागत असल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्यांची खातरजमा केली असता यात तथ्य आढळले आहे. त्यामुळे या ६ डॉक्टर्सना आरोग्य विभागाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दोन दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांना आपल्या कर्तव्यासह रुग्णांशी नीट वागण्याबाबत बजावले आहे. याबाबत डॉ. पानपट्टे यांनी सांगितले की, हे डॉक्टर्स निश्चित वेळेपेक्षा उशिराने रुग्णालयात हजर राहत असल्याने रुग्णांना अपेक्षित सेवा मिळत नाही. रुग्णांच्या वाढत्या गर्दीमुळे त्यांच्यावर राग काढणे आदी तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच नोटिसा बजावण्यात आल्या. यानंतरही डॉक्टर्सच्या कामात फरक न पडल्यास त्यांच्यावर पुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या यातील काही डॉक्टर्सची बदली करण्यात आली असून त्यांना शवविच्छेदन केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.