अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील असतांनाच कुठेही मोकळे पदपथ नसल्याने पादचाऱ्यांना अडथळयाची शर्यत पार करावी लागत आहे. ट्रॅफिक जामने वाहनचालक हैराण असतांना पदपथावर ठिकठिकाणी संबंधित दुकानदारांसह फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असल्याचे आढळून येत आहे. त्यास सर्वस्वी महापालिकेचे प्रभागक्षेत्र अधिकारी जबाबदार असून यात काही साटेलोटे आहे का असा सवाल करत मोकळे पदपथ दाखवा अन् बक्षिस घेऊन जा असे आव्हान आर्किटेक्ट राजीव तायशेटे यांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहे.महापालिकेच्या शहरातील उप इमारती लगत असलेल्या ‘ग’ आणि ‘फ’ तर पश्चिमेच्या ‘ह’ प्रभागातील सर्वच ठिकाणच्या पदपथांची अत्यंत दुरावस्था झाली असून त्याकडे महापालिकेचे अक्षम्य दूर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी सातत्याने महापालिका आयुक्त, उपायुक्त आदींना फोटो पाठवूनही परिस्थितीत तसूभरही फरक पडत नसल्याचे तायशेटे हताशपणे सांगतात.शहरात कसलेही नियोजन नाही, समन्वयाचा अभाव अशी स्थिती निर्माण केली आहे की, केवळ काही करायचेच नाही, केवळ स्वार्थ बघायचा असा सवाल ते करतात. संध्याकाळ झाली की संबंध्ति अधिकारी - कर्मचारी नेमके कुठे जातात हे समजत नाही, फिल्ड वर तर दिसत नाहीत, अन्यथा अशी गचाळ आणि बकाल अवस्था झाली नसती. काही दिवसांपूर्वी अशाच त्रासाने काही नागरिकांनी संबंधित वॉर्ड अधिका-यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी ‘दिवाळी आहे’ ती होऊन जाऊद्या मग करु कारवाई अशा शब्दांत चमत्कारीक उत्तर दिले. परंतु दिवाळी कोणाची अन् का ? असा संतापाचा सवाल केल्यावर मात्र या ठिकाणच्या एस. व्ही. रोडवर तातडीने कारवाई करण्यात आली.
मोकळे पदपथ दाखवा; बक्षीस मिळवा
By admin | Published: November 07, 2014 11:24 PM