रस्त्यावर खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा; मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:51 AM2019-11-01T01:51:57+5:302019-11-01T01:52:15+5:30
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी भरले जातील, अशी आशा मुंबईकरांना होती. पण ते भरले गेले ...
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी भरले जातील, अशी आशा मुंबईकरांना होती. पण ते भरले गेले नाहीत. परिणामी, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे नक्कीच भरले जातील, असे चित्र निर्माण झाले. मात्र ते तेव्हाही भरले गेले नाहीत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर नक्कीच खड्डे भरले जातील, असे मुंबईकरांना वाटत होते. पण ते अजूनही भरले गेले नाहीत. मात्र आता १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली असून, ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’ अशी योजनाच महापालिका राबवत आहे.
मुंबई महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी भांडुप येथे रस्ते विभागाची यासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्यांवरील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुझविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले. परिणामी, १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असा आशावाद पालिकेला आहे. रस्त्यांवर खड्डे दिसलेच तर मात्र ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’ या योजनेअंतर्गत दाखविणाऱ्याला बक्षीस तर खड्डे दाखविल्यावर ते लगेच बुझविण्यात येणार आहेत. याअंतर्गत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. दरम्यान, आॅगस्ट महिन्यात रस्त्यांवर ४१४ खड्डे असल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र विरोधी पक्षांनी हा दावा खोटा ठरविला. महापालिकेच्या अॅपवर हजारो तक्रारी आल्या. तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. पण रस्त्यांवर खड्डे कायम आहेत.
अटी तसेच शर्ती लागू
- खड्डा १ फूट लांब आणि ३ इंच खोल पाहिजे.
- तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
- ‘खड्डे दाखवा, पैसे मिळवा’ या योजनेसाठी My BMC pothole fixlt या अॅपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल.
- नव्या योजनेमुळे १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असा आशावाद पालिकेला आहे.