लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वजनिक प्रवासामध्ये महिलांना सहप्रवाशांकडून विनयभंग अथवा लैंगिक छळासारख्या गंभीर गैरकृत्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्या महिलांचे मनोबळ वाढावे आणि असे गैरकृत्य करणारी व्यक्ती समाजासमोर यावी, या उद्देशाने अक्षरा केंद्र या संस्थेमार्फत एसटी महामंडळाच्या सहकार्याने जगह दिखाओ ही जनजागृती मोहीम शुक्रवारी सुरू केली आहे. याबाबतच्या जनजागृती व प्रबोधनात्मक चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अक्षरा केंद्राने एसटी महामंडळाच्या सहकार्याने काही बस वाहकांशी संवाद साधला जाणार आहे. महिलांना सक्षम बनविण्याचा आणि एसटी बसमधून प्रवास करताना होणाऱ्या गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न केला आहे. प्रवासादरम्यान गैरवर्तनाविरोधात उभे राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, त्यासाठी चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आवश्यक माहिती, मार्मिक सल्ल्यांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रफिती सार्वजनिक प्रवासाच्या दरम्यान होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल सामाजिक दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले जाणार आहे.
भाडे कपातीनंतर महिला प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वपूर्ण बनले आहे. गर्दीच्या वेळी बसेसमधील लैंगिक छळाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी स्वतः महिला, सहप्रवासी आणि वाहक यांच्या सक्रिय सहभागाचे आमचे ध्येय आहे. - नंदिता शहा, सह-संचालक, अक्षरा केंद्र.
प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगह दिखाओ मोहिमेद्वारे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे जुळते. बसमधील लैंगिक छळाचे निर्मूलन करण्यासाठी आणि एसटीतून प्रवास करताना प्रत्येक स्त्रीला सशक्त आणि सुरक्षित वाटेल, याची खात्री देण्यासाठी समर्पित आहोत.- गिरीश देशमुख, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी.