मुंबई : मुसळधार पावसातच आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास वांद्रे पश्चिम, लिंकिंग रोडवरील व्यापारी संकुलात आगीचा भडका उडाला़ केएफसी रेस्टॉरंटजवळ असलेल्या बुटांच्या शोरूममध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले़ सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही़गजबजलेल्या लिंकिंग रोडवरील चार मजली व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या बुटांच्या शोरूममधून आज सकाळी धूर येऊ लागला़ शोरूम बंद असल्याने नेमका धूर कशामुळे येत आहे, हे कळू शकले नाही़ काही मिनिटांतच आगीचे चार बंब व तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले़ मात्र शोरूममध्ये असलेल्या प्लास्टिक आणि चामड्याच्या वस्तूंमुळे आग पसरली़ मुसळधार पावसामुळे अनेक दुकाने सकाळी उघडण्यात आली नव्हती़ आग वाढत असल्याने खबरदारी म्हणून अग्निशमन दलाने एकूण आठ बंब, सहा पाण्याचे टँकर, दोन रुग्णवाहिका मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले़ या परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला़ अखेर दुपारी अडीचनंतर आग आटोक्यात आली़
वांद्रे येथे शोरूमला आग
By admin | Published: July 22, 2015 2:19 AM