लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदर पूर्वेच्या जैसल पार्क येथील खाडीमध्ये मोठ्या संख्येने गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जात असले तरी या खाडीत मलमूत्र व सांडपाणी थेट सोडले जात असल्याने त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने मंगळवारी श्राद्ध घालून कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेतले. जेसलपार्क वसाहत जुनी असून या ठिकाणी पूर्वीपासूनच असलेले मलनिःसारण केंद्र गेल्या काही वर्षां पासून बंद करण्यात आले आहे. या भागातील मलमूत्र-सांडपाणी हे प्रक्रिया न करताच थेट खाडीत सोडले जात आहे. मलमूत्र-सांडपाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने येथील पाणी दुर्गंधी युक्त प्रदूषित झालेले आहे. त्याच पाण्यात दरवर्षी महापालिका गणेश, दुर्गा विसर्जन करत आहे. मलमूत्र व सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सातत्याने केली होती.
पालिकेतील सत्ताधारी भाजपाने या गंभीर बाबी कडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला असल्याचा आरोप करत काँग्रेसने मंगळवारी श्राद्ध घालून निषेध केला. यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे, कुणाल काटकर, दिपक बागडी, विनोद कासारे, विजय दरेकर, ग्रेगरी पिंटो, अलातूर यांनी मुंडन करून श्राद्धाचे पिंड हे मलमूत्र मिश्रित खाडीच्या पाण्यात विसर्जन केले. भाईंदर रेल्वे स्थानक ते जेसलपार्क खाडी पर्यंत निषेध मोर्चा काढला. येणाऱ्या नवरात्री आधी पालिकेने मलनिःसारण प्रकल्प सुरु करून मलमूत्र मिश्रित सांडपाणी खाडीत सोडणे बंद न केल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी दिला आहे. माजी नगरसेवक अनिल सावंत, गीता परदेशी, एस. ए खान, प्रकाश नागणे सह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.