हिरवा मोरपिसारा लेवून आला श्रावण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:44 AM2020-07-21T00:44:59+5:302020-07-21T00:44:59+5:30
त्यापाठोपाठ येणाऱ्या श्रावणात बहरलेला निसर्ग हा त्या तृप्तीचाच हुंकार असतो.
मुंबई : कोरोनासारख्या महामारीनं ग्रासलं असताना आजपासून श्रावणाची धून सुरू झाली आहे. आषाढसरी पिऊन निसर्ग नेहमीसारखाच बहरला आहे. जिकडं तिकडं ‘हिरवे हिरवे गाल गालिचे, हरित तृणांचे मखमलीचे’... असं धरतीचं साजिरं रुप पहायला मिळत आहे. त्याकडे पाहत व्रतवैकल्य करीत गोडाधोडाचा आस्वाद घेत ही श्रावणाची धून ऐकायचीच... अंतर्यामीचा सूर गवसण्यासाठी!
वैशाख वणव्यात होरपळलेली धरती आषाढसरी पिऊन तृप्त होते.
त्यापाठोपाठ येणाऱ्या श्रावणात बहरलेला निसर्ग हा त्या तृप्तीचाच हुंकार असतो. त्यामुळंच तर ‘हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’ असं त्याचं मनोहारी वर्णन केलं जातं. ‘बालभारती’मुळे चिरंजीव झालेली बालकवींची ‘‘श्रावमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येती सरसर शिरवें क्षणात फिरूनी उन पडे’’ ही कविता नुसतीच ओठावर येत नाही तर डोळे उघडे असणाऱ्यांना आजही त्याची प्रचिती येते.
श्रावण म्हणजे सणांचा राजा. व्रतकैवल्यांची रेलचेल असते. सात्विक गोडाधोडाचा बेत घराघरांत असतो. हळदीचे अंग घेऊन सासरी गेलेल्या मुली माहेरी आलेल्या घरांतील लगबग तर काय वर्णावी! नागपंचमी रक्षाबंधन, दहीहंडी हे उत्सवी सण दणक्यात साजरे होतात आणि श्रावण भुर्रकन् निघून जातो.
सध्या कोरोनानं छळलेलं असलं म्हणून काय झालं? आपल्या चातकचोचीनं हा सात्विक आनंदरस पित पित निसर्गातील आणि मनातील श्रावणाचा मेळ घालत आजपासून सुरू होणारी ‘श्रावणधून’जमेल तशी ऐकायची. पुढे आहेच मधाची वाट...!