राज्यात श्रावण सरी बरसल्या, पावसाने बळीराजा सुखावला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:42 AM2018-08-16T08:42:40+5:302018-08-16T08:43:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच आगमन केले आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच सण असलेल्या नागपंचमीला मुंबईसह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच आगमन केले आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच सण असलेल्या नागपंचमीला मुंबईसहमराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही श्रावण सरी कोसळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली होती. तर आजही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे आगमन झाले आहे. श्रावण महिन्यातील या पावसामुळे शेतकऱ्यांनाही आनंद झाला आहे. दुबार पेरणीनंतरच्या या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना अधिकच फायदा होईल. तर, पर्यटकांनाही निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हा पाऊस आनंद देऊन जात आहे. निसर्गरम्य ठिकाणीचे धबधब्यांनाही या पावसामुळे पाणी आले आहे. तर, श्रावणाचे आगमन होताच, सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे. त्यामुळेच 'श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे' ही चारोळी या पावसात आपसूकच तोंडातून बाहेर पडते. दरम्यान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.