Join us

श्रवण कुमार राठोड यांच्या कुटुंबालाही काेराेनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:06 AM

कुंभमेळ्याहून परतल्यानंतर झाले उघड; पत्नीसह एक मुलगा रुग्णालयात, दुसरा गृहविलगीकरणातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार श्रवण ...

कुंभमेळ्याहून परतल्यानंतर झाले उघड; पत्नीसह एक मुलगा रुग्णालयात, दुसरा गृहविलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचा गुरुवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला असतानाच आता दुसरीकडे त्यांची पत्नीदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ त्यांची पत्नीच नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समाेर आले आहे. राठोड पतीपत्नी कुंभमेळ्याला गेले होते. तेथून परत आल्यानंतर राठाेड यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची काेराेना चाचणी करण्यात आली होती. श्रवण कुमार राठोड यांचा मुलगा संजीव यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

काही दिवसांपूर्वी आपले आईवडील कुंभमेळ्यावरून परत आले. त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पुढे असे काही घडेल, वडिलांना गमवावे लागेल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. काेराेनामुळे माझ्या वडिलांचे निधन झाले. मी आणि माझा भाऊही काेराेना पॉझिटिव्ह आहे. भाऊ गृहविलगीकरणात आहे. माझी आई विमलादेवी आणि मी अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहोत. आम्ही आता हळूहळू बरे होत आहोत, असे संजीव यांनी सांगितले.

दरम्यान, माझ्या वडिलांना रुग्णालयाने काहीच मदत केली नाही, अशी चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नाही. उलट रुग्णालयाने आम्हाला वेळोवेळी मदत केली. महापालिकेनेही मदत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

....................................