मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्याच्या कलियुगात माणुसकी हरवली असे आपण म्हणतो, ते खोट ठरवणारा अनुभव पुण्याच्या डॉ. पल्लवी लोकेगावकर यांना आला. मुंबईतील गाेरेगावमध्ये राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध आई-वडिलांच्या लसीकरणासाठी गोरेगाव प्रवासी नागरिक संघ व नगरसेवक संदीप पटेल श्रावणबाळाप्रमाणे धावून आले, असे त्यांनी सांगितले.
सध्या लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. लसींचा साठा कमी असून, अनेक ठिकाणी पहाटेपासून लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे.
आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये आणि लवकर लस मिळावी यासाठी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची धडपड सुरू आहे. ज्येष्ठांची लसीकरणाची वेगळी रांग आणि व्यवस्था नसल्याने आपल्याला लस कशी आणि केव्हा मिळणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
गोरेगाव पश्चिम, बांगूरनगर येथे पुण्याच्या डॉ. पल्लवी लोकेगावकर यांचे वृद्ध आई-वडील राहतात. वडिलांचे वय ८१, तर आईचे ७५ असून, आईला अजिबात दिसत नाही. डॉ. पल्लवी पुण्यात कल्याणीनगर येथे राहात असल्याने आणि लॉकडाऊनमुळे सध्या मुंबईत येणे शक्य नसल्याने आपल्या आईवडिलांचे लसीकरण कसे हाेणार, ही चिंता हाेती.
अखेर गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला.
चितळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी व भाजपचे प्रभाग क्रमांक ५८ चे स्थानिक नगरसेवक संदीप दिलीप पटेल
यांनी वृद्ध आई-वडिलांना श्रावण बाळाप्रमाणे मोलाची मदत केली. आई-वडिलांना गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर लसीकरण केंद्रावर गुरुवारी दुपारी राजन सावे यांनी नेले. तिथे लसीकरण नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तोपर्यंत उदय चितळे व प्रीतम सावे हे जातीने हजर होते.
भाजपचे प्रभाग क्रमांक ५८ चे स्थानिक नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी वृद्ध आईवडिलांना मदत करत त्यांचे लसीकरण केले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गाडीने आईवडिलांना घरी सुखरूप पोहोचवले. स्वतः ते मित्राच्या बाईकमागे बसून गेले, अशी माहिती डॉ. लोकेगावकर यांनी खास पुण्यावरून ‘लोकमत’ला दिली.
ज्येष्ठ नागरिक विशेषकरून वृद्धांसाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था असावी, त्यांना जास्त वेळ रांगेत उभे न करता लसीकरण सुलभ व लवकर होण्यासाठी मदतनीस देण्यात यावा अशी यंत्रणा राज्यात व मुंबईत असली पाहिजे, असे मत डॉ. पल्लवी लोकेगावकर यांनी व्यक्त केले.
सध्याच्या कलियुगात माणुसकी हरवली असे आपण म्हणतो ते खोट ठरवणारा हा अनुभव आपल्याला आला असे त्यांनी सांगितले. वृद्ध आई-वडिलांच्या मदतीला धावून येणाऱ्या गोरेगाव प्रवासी नागरिक संघ व नगरसेवक संदीप पटेल यांचे त्यांनी आभार मानले.
......................................