‘श्री’रंगी रंगली मुंबापुरी !

By admin | Published: September 14, 2015 03:13 AM2015-09-14T03:13:47+5:302015-09-16T11:53:49+5:30

गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस राहिले असताना गणपतीच्या तयारीसाठी मुंबईकरांनी रविवारचा मुहूर्त साधला. शहरातील विविध मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली.

'Shree' Rangely Munabapuri! | ‘श्री’रंगी रंगली मुंबापुरी !

‘श्री’रंगी रंगली मुंबापुरी !

Next

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस राहिले असताना गणपतीच्या तयारीसाठी मुंबईकरांनी रविवारचा मुहूर्त साधला. शहरातील विविध मार्केटमध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात कार्यकर्ते सजावटीच्या कामात मग्न होते.
बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यासाठी रविवारचा आळस झटकून गणेशभक्त कामाला लागले होते. दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, अंधेरी, बोरीवली, कुर्ला, भांडुप परिसरातील मार्केटमध्ये भाविकांनी एकच गर्दी केली होती. लाडक्या बाप्पाची आरास सजवण्यासाठी मखर, थर्माकॉलचे खांब, शंख, स्वस्तिक, घंटा, उंदीर अशा वस्तूंची खरेदी सुरू होती. मात्र इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भक्तांनी थर्माकॉलच्या वस्तू आणि मखरांकडे पाठ फिरवली. या भक्तांनी बाप्पाच्या सजावटीसाठी पडदे, कागदाच्या मखरांना पसंती दिली. दिव्यांची आरास करण्यासाठी दिव्यांच्या माळांची खरेदी केली जात होती. इलेक्ट्रिकवर चालणारी दीपमाळ, निरांजन, समई, पणत्यांनी अनेक भक्तांना आकर्षित केले.
उदबत्त्या, धूप, कापूर, गुलाल, बुक्का अशा पूजेच्या सामानाच्या वस्तू खरेदी यादीत होत्या. वस्तूंची खरेदी करीत असतानाच बाप्पासाठी लागणाऱ्या फुलांचे, हारांचे, फुलांच्या वाडीचे बुकिंगदेखील केले जात होते. लहानसहान गोष्टी विसरायला नको म्हणून यादीनुसार खरेदी सुरू होती. मुंबईकर सकाळपासूनच खरेदीसाठी घराबाहेर पडले असल्यामुळे ट्रेन, बेस्टला गर्दी होती. घरांमध्ये गणपतीसाठीची साफसफाई सुरू होती. तर लहान मुले मखर करण्यात मग्न होती.
दुसरीकडे शहरातील विविध गणपती मंडळांच्या मंडपात कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. काही मंडपांत गणपती बाप्पा आधीच विराजमान झाले आहेत. त्या मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात होता.

Web Title: 'Shree' Rangely Munabapuri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.