Join us

समृध्दी महामार्गावर कौशल्य विकासाचा ‘श्री गणेशा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 5:58 PM

कौशल्य विकास केंद्र आणि आयटीआयची उभारणी

ठळक मुद्देभविष्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्रशिक्षण

मुंबई मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना वेगवान वाहतूक व्यवस्थेने जोडण्यासाठी समृध्दी महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. महामार्ग ज्या जिल्ह्यातून जातो त्या भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रोथ सेंटर्सही उभारण्याचे नियोजन आहे. त्यातून भविष्यात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. मात्र, त्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिकांकडे कौशल्याची कमतरता असेल. तिथे परप्रांतीय तरुणांचा भरणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यातील ही संभाव्य कोंडी टाळण्यासाठी या महामार्गावरील पाच जिल्ह्यात ९ ठिकाणी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.  

७०१ किमी लांबीच्या समृध्दी महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील वाहतूक दीड ते दोन वर्षांत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या महामार्गावर १९ ठिकाणी ग्रोथ सेंटर्स (टाऊनशीप) विकसीत केले जाणार असून तिथे कृषी विकास केंद्र आणि कमर्शियल हब स्थापनेचे नियोजन आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार पुढे आल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील फुगाळे गावासह केळझार आणि विरूल (वर्धा), मेहकर, सावरगाव (बुलढाणा), हडस पिंपळगाव, घाईगाव, बबटारा (औरंगाबाद) आणि फुगाळे (ठाणे) या ठिकाणी ही केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. एमएसआरडीसीए ही व्यवस्था खासगी भागिदाराच्या सहकार्याने उभारणार आहे. प्रस्तावाचे तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात घेत त्यानुसार केंद्रांचे नियोजन केले जाईल. या केंद्राची आर्थिक व्यवहार्यता तिथले व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यासक्रमाची आखणी, काळानुरूप त्यात आवश्यक असलेले बदल प्रशासकीय कामकाज, त्याचे मार्केटींग, ब्रँण्डींग अशी सर्व जबाबदारी भागीदार संस्थेवरच असेल. ग्रोथ सेंटर्सच्या निर्मितीनंतर या ठिकाणी ज्या कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तिथे हे कुशल स्थानिक तरूण नोकरी किंवा व्यवसाय करू शकतील. या केंद्रांच्या उभारणीसाठी स्वारस्य देकार मागविण्यात आले असून ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष केंद्रांची उभारणी सुरू होईल असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

 

विविध क्षेत्रातील प्रशिक्षणाची संधी : स्थानिक पातळीवरील आर्थिक केंद्रांमध्ये भविष्यात निर्माण होणा-या रोजगाराच्या संधीनुसार कृषी आणि संलग्न उद्योग, इमारत बांधकाम, वाहनांची देखभाल दुरूस्ती, केमिकल आणि फार्मा, आयटी, आरोग्य सेवा, टेक्सटाईल आणि कापड निर्मिती, पर्यटन, हाँस्पिटॅलिटी, वाहतूक आणि लाँजिस्टीक, शिक्षण, फूड प्रोसेसींग, ज्वेलरी मेकिंग, इलेक्ट्रीशन, वेल्डर, प्लंबर, सुतार यांसह असंख्य क्षेत्रातील प्रशिक्षिणाची संधी या ठिकाणी तरुणांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

टॅग्स :महामार्गरस्ते वाहतूकसरकारमहाराष्ट्रमुंबईनागपूर