श्री सदस्यांनी फुलविली वनराई
By admin | Published: April 3, 2015 10:33 PM2015-04-03T22:33:33+5:302015-04-03T22:33:33+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वीच खोपोली-ताकई येथील वनविभागाच्या जागेत एक हजार वृक्षलागवड करण्यात आली होती
मोहोपाडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वीच खोपोली-ताकई येथील वनविभागाच्या जागेत एक हजार वृक्षलागवड करण्यात आली होती. आज हे वृक्ष डौलाने उभे आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे चित्र असताना श्री समर्थ बैठकीच्या सदस्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली वृक्षलागवड वनराईच्या रूपाने फुलल्याचे चित्र आहे.
श्री समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्र म ठिकठिकाणी राबविले जातात. मागील पावसाळ्यात वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन हा कार्यक्र म सदस्यांनी हाती घेतला होता. यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणांसह खालापूर तालुक्यातही विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. यात पिंपळ, निलगिरी, कडुनिंब, ताम्हण, करंज, आर्जुन, रिठा साफकर्णी, कुंतजीवा, निंबारा, रेन ट्री, वड या वृक्षांची लागवड करण्यात आली. पावसाळ्यात वृक्षांच्या बाजूला वाढलेले गवत काढून गुरांपासून त्यांचे रक्षण व्हावे, याकरिता लाकडी काट्यांचे कुंपणही घालून त्याभोवती छिद्र असलेली जाळी लावण्यात आली आहे. सध्या श्री सदस्यांकडून या झाडांना रोजच पाणी घातले जात असून लावलेल्या झाडांची व्यवस्थित देखभाल होत असल्याने वृक्षांची वाढ उत्तमप्रकारे होत आहे. (वार्ताहर)