मुंबई - अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू असताना संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांद्वारे श्रीरामनामाचा जागर सुरू आहे. मुंबईमध्ये ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या सुमधूर 'गीत रामायण'च्या माध्यमातून 'श्रीराम आनंद सोहळा' रंगणार आहे.
'याची देही याची डोळा, श्रीराम आनंद सोहळा...' असा नारा देत मुंबईमध्ये 'गीत रामायण' सादर केले जाणार आहे. २० ते २३ जानेवारी या काळात अनुक्रमे दीनानाथ नाट्यगृह, साहित्य संघ मंदिर, रंगशारदा आणि यशवंत नाट्यमंदिर येथे माडगूळकर आणि फडके यांची अजरामर सुमधूर कलाकृती असलेले 'गीत रामायण' सादर केले जाईल. प्रेक्षकांसाठी विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका प्रत्येक दिवशी सायंकाळी नाट्यगृहांच्या तिकिट खिडकीवर उपलब्ध असणार आहेत. आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या सहयोगाने जीवनगाणीचे निर्माते प्रसाद महाडकर हा अनोखा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात गीत-संगीतासोबतच प्रभू श्रीरामाची महती तसेच नृत्यही सादर केले जाईल. यात ऋषिकेश रानडे, निनाद आजगावकर, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, केतकी भावे जोशी या गायकांनी गाणी रसिकांना ऐकता येतील. नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे आणि ग्रुप नृत्य सादर करणार असून, निवेदनाची जबाबदारी डॅा. संजय उपाध्ये सांभाळणार आहेत.
गीत रामायण पुण्यात प्रथम आकाशवाणीवरून सादर झाले होते. त्यानंतर राज्यभर त्याच्या सादरीकरणाचे प्रयोग सुरू झाले. 'गीत रामायण' सादर करताना बाबूजींनी 'श्रीराम... श्रीराम... श्रीराम...' असा आलाप घेताच श्रोते तल्लीन होऊन जायचे. 'स्वयें श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती...' या गीतापासून सुरू होणारा हा स्वरप्रवास उत्तरोत्तर अधिकाधिक रंगत जायचा. 'उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले...', 'दशरथा, घे हे पायसदान...', 'सावळा गं रामचंद्र...', 'स्वयंवर झाले सीतेचे...', 'नको रे जाऊ रामराया...', 'जेथे राघव तेथे सीता...', 'जय गंगे जय भागीरथी', 'माता न तू वैरिणी...' अशा एका पेक्षा एक अर्थपूर्ण आणि सुमधूर गीतांद्वारे वेगवेगळ्या भावभावना सादर केल्या जायच्या. 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' मधील सीतेचा शोक ऐकताना अनाहुतपणे श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. हाच भाव आजच्या गायकांच्या आवाजात सादर करण्याचा प्रयत्न जीवनगाणीच्या माध्यमातून होणार आहे.