संजय घावरे
मुंबई : १४ मार्च २०२० रोजी बंद झालेले दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृह ३० एप्रिल २०२२ रोजी पुन्हा सुरू होणार आहे. दोन वर्षे आणि ४७ दिवस म्हणजेच तब्बल ७७७ दिवसांनी नूतनीकरणानंतर नाट्यगृह रसिकांसाठी खुले होणार आहे. ३० एप्रिल रोजी 'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.
३ मे रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा ५८ वा वर्धापन दिन असल्याने त्या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी नाटयगृह पुन्हा सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस होता, पण शनिवार-रविवारी प्रयोग करण्याच्या निर्मात्यांच्या मागणीचा मान राखत ३० एप्रिलला शिवाजी मंदिरचा पडदा पुन्हा उघडणार आहे. कोरोनामुळे नाट्यगृहांना टाळे लागल्यानंतर शिवाजी मंदिरच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्णत्वास आल्याने ३० एप्रिलला सकाळी 'अलबत्या गलबत्या', दुपारी 'मी स्वरा आणि ते दोघं', रात्री 'हिच' तर फॅमिलीची गंमत आहे', १ मे रोजी सकाळी 'चमत्कार', दुपारी 'दादा एक गुड न्यूज आहे' आणि रात्री 'आमने सामने' या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
१४ मार्च २०२० रोजी 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर नाटयगृह बंद झाले होते. नूतनीकरणानंतर पुन्हा नाटयगृह सुरू करण्याबाबतची माहिती देताना श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस चंद्रकांत उर्फ अण्णा सावंत यांनी 'लोकमत'शी विशेष बातचित केली. नाटयगृह बंद करण्याचे आदेश आल्यानंतर नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले, पण ते वाढतच गेल्याने विलंब झाला. नूतनीकरण करताना स्टेज आणि साऊंडसाठी नाट्यसृष्टीतील व्यक्तीच व्यवस्थित काम करू शकतो असे सर्वांचे मत होते. त्यानुसार नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी साऊंडसाठी मदत केली आणि नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी रंगमंच तयार केला. मिक्सर, अॅम्प्लीफायर, बॉक्स सर्व काही नवीन बसवून डिजिटल साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे. बल्ब्ज आणि ट्यूबलाईटस बदलून एलईडी आणि स्पॉट लाईटस लावण्यात आल्या आहेत. इंटेरियर पूर्णपणे बदलून सिलिंग व रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे. फळ्यांचा रंगमंच आता मरीन प्लायचा बनवला आहे. रुंदी पाच फूट वाढवल्याने दोन्ही कोपऱ्यात बसणाऱ्या रसिकांनाही रंगमंचावरील स्पष्ट दिसेल. पूर्वी व्ह्यू २८ फुटांचा होता आता ३३ फूट झाला आहे. कर्टन्सची वरची झालर कमी उंचीही अडीच फुटाने वाढवली आहे. त्यामुळे बाल्कनीमधूनही रंगमंचावरील सर्व स्पष्ट दिसेल. २०१४मध्येच सीटस बदलण्यात आल्याने आता केवळ नवीन सीट कव्हर्स घातली आहेत. रंगमंचाची उंची आणि रुंदी वाढल्याने कर्टन्सही नवीन केले आहेत. आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत.
नूतनीकरणासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा सध्या तरी तिकीट दरावर काही परिणाम होणार नाही. मे-जूनसाठी निर्मात्यांना परवडेल असे आणि त्यांच्याशी चर्चा करून भाडे कमी करून देण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील भागाच्या रंगरंगोटीचे उरलेले काम काही दिवसांनी हाती घेण्यात येणार आहे. अद्यापही कामे सुरू असल्याने नूतनीकरणासाठी झालेल्या खर्चाचा आकडा समजू शकलेला नाही. बाल्कनीमध्ये कार्पेट बसवण्याचे काम सुरू आहे. ३ मे या वर्धापन दिनापर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. खरे तर त्याच दिवशी नाट्यगृह सुरू करण्याची योजना होती, पण त्यापूर्वी येणारा शनिवार-रविवार फुकट जाऊ नये म्हणून निर्मात्यांच्या मागणीचा मान राखून ३० एप्रिललाच नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडणार आहे. आता मे-जून महिन्याचे बुकींग झालेले आहे.
(फोटो - दत्ता खेडेकर)
नूतनीकरणानंतर करण्यात आलेले बदल :ओपनिंग दोन्ही बाजूंना अडीच फुटांनी म्हणजेच एकूण पाच फुटांनी वाढवले आहे.कर्टन्स कमी करून उंचीही अडीच फुटांनी वाढवण्यात आली आहे.रंगमंचावर मरीन प्लायचे फ्लोअरिंग करण्यात आले आहे.संपूर्ण नाट्यगृहात एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत.आता स्टेजवरून पाहिल्यावर साऊंड सिस्टीम उजव्या बाजूच्या कॅार्नरवर असेल.डिजिटल साऊंड सिस्टीमसह वातानुकूलीत यंत्रणेची समस्या दूर झाली आहे.दोन्ही मेकअप रुम्स वातानुकूलीत करण्यात आल्या आहेत.कलाकारांच्या शौचालयात कमोड बसवण्यात आले आहेत.आसनांची कव्हर्स बदलण्यात आली असून, भिंतींना रंगरंगोटीही करण्यात आली आहे.