‘सिनेमा पाहणारा माणूस’ पुस्तकास ‘श्री स्थानक’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:27+5:302020-12-27T04:05:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने ‘श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ आणि ‘वामन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने ‘श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ आणि ‘वामन अनंत रेगे पुरस्कार’ या दोन पुरस्कारांनी उत्कृष्ट साहित्यास गौरविले जाते. यंदा अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकास श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तो आत्मचरित्र - चरित्र विभागातून देण्यात येणार आहे, तसेच इतर साहित्यकृतीसही पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्व पुरस्कारांचे स्वरूप पाच हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे. लवकरच हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
श्री स्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारात चरित्र-आत्मचरित्र, कादंबरी, कथा, कविता, अनुवाद, विनोद, समीक्षा-संशोधन, इतिहास, विज्ञान, पर्यावरण, प्रवास वर्णन, बालसाहित्य या विषयांचा समावेश आहे. वामन अनंत रेगे पुरस्कार हे ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी असून, यात ललित आणि ललितेतर असे दोन विभाग आहेत. कादंबरी विभागातून अहमद शेख यांच्या भट्टी, कथा विभागातून किरण येले यांच्या तिसरा डुळा, कविता विभागातून विनय पाटील यांच्या आदितृष्णा, अनुवाद विभागातून डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे यांच्या अस्पृश्य देवता आणि आणि निवडक कथा, प्रवास विभागातून डॉ.संदीप श्रोत्री यांच्या ‘मनूचे अरण्य: अमेझॉनच्या खोऱ्यातील भटकंती’, इतिहास विभागातून किरण गोखले यांच्या ‘दुसरे महायुद्ध’, विज्ञान विभागातून डॉ.दिलीप बावचकर यांच्या ‘किडनीविषयी बोलू काही’, समीक्षा/संशोधन विभागातून डॉ.प्रिया प्रदीप निघोजकर यांच्या ‘त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकांची बखर’, विनोद विभागातून संजय बोरुडे यांच्या ‘आत्महत्या मार्गदर्शन केंद्र’, बालविभाग विभागातून डॉ.सुरेश सावंत यांच्या ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या साहित्यांस श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ललित विभागातून सुरेश वाळके यांच्या ‘नाथाचा चाफा’ आणि शुभांगी पासेबंद यांच्या ‘नक्षत्रबन’ या पुस्तकांस विभागून, तर ललितेतर विभागात जयश्री देसाई यांच्या ‘अयोध्येत श्रीरामाची विजयपताका’ आणि अनंत ओगले यांच्या ‘महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकांस विभागून जाहीर झाला आहे.