मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्री आणि सिनेसृष्टीच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कालपासून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. मृत्यू झाला तेव्हा श्रीदेवी ह्या दुबईमधील हॉटेलच्या खोलीत होत्या. त्यांना हृदयाचा कोणताही आजार नव्हता. त्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया साधारण अशीच होती. या सगळ्यांकडून श्रीदेवी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. या सगळ्यात तीन वर्षांपूर्वी श्रीदेवी यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावेळी श्रीदेवी यांनी मृत्यूला अक्षरश: हुलकावणी दिली होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तीन वर्षांपूर्वी एका भीषण अग्निकांडातून श्रीदेवी थोडक्यात बचावल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की, त्यात श्रीदेवी यांचा बेडही जळून खाक झाला होता. नोव्हेंबर २०१३ सालची ही घटना. श्रीदेवी व बोनी कपूर यांच्या अंधेरी येथील बंगल्याला अचानक आग लागली. ही आग लागली, तेव्हा श्रीदेवी दोन्ही मुली जान्हवी व खुशीसोबत बंगल्यात होत्या. सुदैवाने तिघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले होते.
श्रीदेवी यांचा जीवनप्रवास- श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 ला तामिळनाडूत झाला होता. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवींना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.- 1996 मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता-दिग्दर्शक बॉनी कपूर यांच्याही लगीनगाठ बांधली. जान्हवी आणि खुशी या त्यांच्या दोन कन्या. - बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. - श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट 'सोलवां सावन' होता. 1979 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. - 1989 मध्ये 'चालबाज' या चित्रपटात श्रीदेवी यांनी डबल रोल साकारला होता. या अभिनयाबद्दल त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.- 1991 मध्ये 'यशराज'च्या 'लम्हे'मध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारली आणि दुसऱ्या फिल्मफेअरची दुसरी बाहुली पटकावली.- 1996 मध्ये बोनी यांच्यासह विवाहबंधनात अडल्यानंतर चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. - 2012 मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. 16 वर्ष चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं. - सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई , जाग उठा इंसान, हिम्मतवाला, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नजराना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर कानूनी, हीर रांझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चांद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम हे श्रीदेवी यांचे काही चित्रपट. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून 2013 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.