हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी श्रीकांत दातार; सलग दुसऱ्यांदा भारतीय व्यक्तीची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:58 AM2020-10-11T02:58:36+5:302020-10-11T02:59:05+5:30
दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार आहेत. कोविड-१९ साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन/मुंबई : जगप्रसिद्ध तसेच ११२ वर्षे जुन्या हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या (एचबीएस) डीनपदी मूळचे मुंबईकर असलेले श्रीकांत दातार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा हे पद भारतीयास मिळाले. दातार यांची कारकीर्द १ जानेवारी २0२१ पासून सुरू होईल.
दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार आहेत. कोविड-१९ साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे. दातार हे १९९६ साली एचबीएसमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. वरिष्ठ सहयोगी डीन या नात्याने त्यांनी प्राध्यापकांची भरती, शिक्षक प्रशिक्षण, कार्यकारी शिक्षण आणि संशोधन इत्यादी क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी अभिनंदन केले आहे. श्रीकांत दातार एक इनोव्हेटिव्ह शिक्षक आणि अनुभवी अकॅडेमिक लीडर आहेत. गेली २७ वर्षे ते हॉवर्डशी जोडले गेले आहेत, असे हॉवर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून कौतुक
हॉवर्ड मॅगझिनमध्ये दातार यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या माहितीची लिंक जोडून त्यांचे अभिनंदन करणारी पोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिष्ट्वटरद्वारे शेअर केली. तर, हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे. ही माझ्यासाठी आणि तमाम मराठीजनांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दातार यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.
मुंबई विद्यापीठाचे पदवीधर
दातार शिक्षणतज्ज्ञ असून मूळचे मुंबईकर आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनोन शाळेतून झाले. १९७३ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून गणित आणि अर्थशस्त्राची पदवी परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांनी अहमदाबाद आयआयएममधून व्यवस्थापनाचे, तर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.
दातार हे एचबीएसचे ११ वे डीन ठरतील. नितीन नोहरिया यांची ते जागा घेतील. नोहरिया यांनी जून २0२0 मध्येच डीन पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. तथापि, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरपर्यंत जबाबदारी सांभाळण्याचे त्यांनी मान्य केले होते.