पदवीधर व शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
By सीमा महांगडे | Published: September 26, 2022 07:12 PM2022-09-26T19:12:40+5:302022-09-26T19:14:30+5:30
पात्र शिक्षक व पदवीधरांसाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज नोंदणीची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत. मात्र त्यासाठी नोंदणी प्रक्रिया येत्या १ ऑक्टोबरपासून सुरु होत असून ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पात्र शिक्षक व पदवीधरांना अर्ज करण्याची मुदत असणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी दिली. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी ही उपस्थित होते.
महत्त्वाचे म्हणजे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकिय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे श्रीकांत देशपांडे याची स्पष्ट केले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्धी केली जाईल अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी यावेळी दिली.
अर्ज करण्यास पात्र कोण?
राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पुर्वी किमान ३ वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर,२०२२ रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.
कसा करावा अर्ज ?
पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. १८ भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध तसेच संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा गुणपत्रिकेची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. १ ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न ही करण्यात येणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. १९ भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. या अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.